मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस पक्षातील काही आमदार फुटीरतेच्या मार्गावर आहेत. पूर्वी हे आमदार भाजपच्या संपर्कात होते. मात्र, अजितदादा यांच्या सत्तेतील सहभागामुळे त्यांचा प्रवेश लांबला होत. परंतु, यातील काही आमदार आता अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिद देवरा यांनी नुकताच पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला. मात्र, या आमदारांनी जातीय समीकरणे लक्षात घेऊन हे आमदार अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत असेही या सूत्रांनी सांगितले.
माजी मंत्री आणि वांद्रेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात सामील होऊ शकतात, अशी पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरु आहे. बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर बडा सिद्दिकी अजितदादा गटात सामील होणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
बाबा सिद्दिकी यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना ‘मला माहिती नाही ही गोष्ट कशी समोर आली. पण आता आली आहे. मी जायचं असेल तर मी उघडपणाने जाईन. लपून छपून जाणार नाही. जाण्याचा प्रश्नच येत नाही, मी काय बोलू.’ असे म्हणाले होते. तर, त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी यांनी ‘मी वडिलांच्या योजनांबद्दल बोलू शकत नाही. मात्र, अजित पवारांनी आपल्याला मुलाप्रमाणे वागणूक दिली. कठीण काळात त्यांनी साथ दिली.’ अशी प्रतिक्रिया दिली होती.
मुंबईमध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, अमीन पटेल आणि झीशान सिद्दीकी असे चार आमदार आहेत. त्यातील आमदार अमीन पटेल हे मिलिंद देवरा यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर, त्यातील झीशान सिद्दीकी आणि माजी मंत्री अस्लम शेख हे आमदार भ्रष्टाचार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री नवाब मलिक यांना अजितदादा गटात प्रवेश दिल्यामुळे अजित पवार यांना भाजपची नाराजी ओढवून घ्यावी लागली होती. तर, मुंबईमध्ये अजितदादा गटाकडे मुस्लीम मातांना आकर्षित करून घेणारा चेहरा नाही. त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांना आपल्याकडे खेचण्याची तयारी अजितदादा गट करत आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी असाही दावा केला आहे की महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनाही बाजू बदलण्यासाठी संपर्क साधण्यात आला होता. परंतु, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. नसीम खान हे चांदिवली येथून विधानसभा निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने पराभूत झाले होते.
27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणुक आहे. तर, 20 मार्च रोजी मुंबईत राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या समारोप होणार आहे. त्याआधीच पक्ष बदलण्यासाठी या आमदारांना प्रवृत्त करण्यात येत आहे. तर, अजितदादा गटाच्या एका नेत्याने काँग्रेसचे किमान 15 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेत प्रवेश केलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांचे जवळचे सहकारी अमीन पटेल यांनी देवरा यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. कारण, त्यांना शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घ्यायचा नव्हता. त्याचप्रमाणे त्यांना भाजपमध्येही जायचे नाही. त्यामानाने या आमदारांना अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जवळचा वाटत आहे. मुस्लीम नेत्यांना भाजप किंवा शिंदे गटात सामील होण्यापेक्षा अजित पवार गटात सामील होणे अधिक सोयीचे वाटत आहे. कारण, अजित पवार यांनी जाणीवपूर्वक आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असेही या सूत्रांनी सांगितले