मुंबई : महाराष्ट्रामध्ये H3N2 विषाणूचा (H3N2 Virus) धोका वेगाने वाढताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत H3N2 व्हायरसच्या रुग्णांची (patients)संख्या 352 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र सध्या परिस्थिती आटोक्यात असल्याचे आरोग्यमंत्री (health minister)तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये या आजारामुळे एकाचा मृत्यू झाला असून हा राज्यातील पहिला मृत्यू आहे.
एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला संसर्गजन्य आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तरुणावरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा तरुण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या संसर्गजन्य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत H3N2 चे 352 रुग्ण
राज्यात H3N2 व्हायरसच्या रुग्णांची संख्या 352 इतकी आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी आज सांगितले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयांना अलर्ट राहण्यास सांगितले. H3N2 हा घातक नाही, योग्य उपचारांनी तो बरा होऊ शकतो. कोणीही घाबरण्याची गरज नाही, असेही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.
Maharashtra | 352 patients of H3N2 virus have come so far. Their treatment is going on and hospitals have been asked to be on alert. H3N2 is not fatal, can be cured by medical treatment. No need to panic: Tanaji Sawant, Maharashtra Health minister
— ANI (@ANI) March 15, 2023
दोन मृत्यूंबाबत शंका
दरम्यान गेल्या आठवड्याभरात दोन रुग्णांच्या झालेले मृत्यू हे H3N2 व्हायरसमुळे झाल्याबाबत डॉक्टरांना अद्याप शंका आहे. मात्र याबाबत अधिक तपशीलांसह अहवालाची प्रतीक्षा आहे. खरंतर या दोन्ही रुग्णांना H3N2 ची बाधा होतीच.मात्र त्यासोबतच कोविड 19 आणि इतर आजारदेखील त्यांच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याचं प्राथमिक अहवालात समोर आलं आहे. अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थाचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील सविस्तर अहवाल अजून येणं बाकी आहे. तर नागपूरमध्ये 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यूही H3N2मुळे झाल्याची डॉक्टरांना शंका आहे.
ही आहेत लक्षणे
– खोकला
– सर्दी
– 100 डिग्रीपेक्षा जास्त ताप
– अशक्तपणा जाणवणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– श्वासोच्छवासाचा वेग वाढणे
– छातीत दुखणे
– अंगदुखी
– शरीरातली पाण्याची पातळी कमी होणे
– अचानक चक्कर येणे
काळजी कशी घ्यावी ?
– सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा
– गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा
– हात स्वच्छ ठेवा. सॅनिटायझरचा वापर करा.
– डोळे, नाकाला, तोंडाला वारंवार स्पर्श करु नका
– खोकताना किंवा शिंकताना मास्क लावा
– सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
– भरपूर पाणी प्या
– ताजी फळे आणि फळांचा रस यांचे सेवन करा.
– पौष्टिक आहाराचे सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवा.