इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात चिमुकली पडली, जेसीबी मशीनद्वारे सुटकेचा थरार

| Updated on: Nov 09, 2021 | 1:58 PM

ईश्वरी गंगावणे ही चार वर्षीय चिमुकली आज (मंगळवारी) सकाळी एका निर्माणाधीन इमारतीजवळ खेळत होती. यावेळी इमारतीसाठी खोदलेल्या 15 फूट खोल खड्डयात ती पडली.

इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात चिमुकली पडली, जेसीबी मशीनद्वारे सुटकेचा थरार
कोपरगावमध्ये खड्ड्यात पडलेल्या मुलीची सुटका
Follow us on

शिर्डी : इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार वर्षांची चिमुकली पडली होती. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर तिची सुटका करण्यात प्रशासनाला यश आलं आहे. प्रथमोपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, परंतु तिची प्रकृती स्थिर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात इमारतीच्या बांधकामासाठी पाईलच्या‌ खड्डयात पडलेल्या चार वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात प्रशासनाला‌ यश आलं आहे. दोन तास शर्थीचे प्रयत्न करून चिमुकलीला बाहेर काढण्यात आले. ईश्वरी संतोष गंगावणे असे मुलीचे नाव आहे.

खेळता-खेळता खड्ड्यात पडली

ईश्वरी गंगावणे ही चार वर्षीय चिमुकली आज (मंगळवारी) सकाळी एका निर्माणाधीन इमारतीजवळ खेळत होती. यावेळी इमारतीसाठी खोदलेल्या 15 फूट खोल खड्डयात ती पडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कळवले.

कशी केली सुटका?

नगरपालिकेचे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रेस्क्यू करण्यास सुरुवात केली. जेसीबी मशीन बोलावून समांतर खड्डा खोदण्यात आला. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने ईश्वरीला सुखरुप बाहेर काढले. प्राथमिक उपचारासाठी तिला नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मुंबईत खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या अँटॉप हिल भागात खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला होता. पाईपलाईनच्या दुरुस्ती कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे दोघा मुलांना जीव गमवावा लागला. मुंबईतील अँटॉप हिल परिसरात असलेल्या सीजीएस कॉलनी सेक्टर 7 मध्ये हा अपघात झाला होता. 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळी दोन्ही मुलं तिथल्या मैदानात खेळत होती. यावेळी येथील पाईपलाईन दुरुस्तीकरण कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात दोन्ही मुलं अचानक पडली. त्यांना सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु डॉक्टरानी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केलं होतं.

इतर बातम्या :

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघींची सुटका, एजंट अटकेत

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच दुसऱ्या मिनिटाला नवाब मलिकांचं ट्विट, ‘आ रहा हूँ मैं…!’

EPFO खातेधारकांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या कमाईत होणार वाढ, जाणून घ्या सर्वकाही