Amravati Lockdown | अमरावती जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन, सात दिवस कडकडीत बंद

| Updated on: May 10, 2021 | 10:47 AM

अमरावती जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. (Amravati district complete lockdown)

Amravati Lockdown | अमरावती जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन, सात दिवस कडकडीत बंद
लॉकडाऊन
Follow us on

अमरावती : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनाने पुढील सात दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानुसार रविवारी 9 मे दुपारी 12 वाजल्यापासून 15 मे पर्यंत अमरावती जिल्हा संपूर्ण बंद राहणार आहे.(Amravati district complete lockdown)

अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या 15 मे पर्यंत अमरावतीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात फक्त मेडिकलची दुकान आणि हॉस्पिटल्स सुरु राहणार आहेत. बाकी इतर सर्व दुकाने बंद राहतील.

लॉकडाऊनदरम्यान काय सुरु, काय बंद?

तसेच या लॉकडाऊनदरम्यान जे लोक विनाकारण बाहेर फिरतील त्यांच्या दुचाकी गाड्या जप्त केल्या जातील. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याशिवाय किराणा सामान, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, अंडी, मद्यालय, मद्य दुकाने आणि बार बंद राहणार आहे. तसेच किराणा आणि भाजीपाल्याची घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 दरम्यान दिली जाईल. पण ग्राहकांना प्रत्यक्षात दुकानात जाऊन काहीही खरेदी करता येणार नाही.

त्याशिवाय शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, शिवभोजन थाळीची घरपोच सेवाही देता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी मंडई आणि आठवडी बाजारही बंद राहतील. पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाशी संबंधित असणाऱ्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पण त्यासाठी होम डिलिव्हरीची सेवा दिली जाणार आहे.

तसेच कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. शेतकऱ्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कृषी सेवक, तालुका कृषी अधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे.

लग्नासाठी हॉल बंद, 15 जणांच्या उपस्थितीत घरातच सोहळा 

तसेच लॉकडाऊन काळात स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पूर्णत: बंद ठेवली जातील. लग्न समारंभ घरगुती पद्धतीने करण्याची सूचना देण्यात आली आहे. अवघ्या 15 जणांच्या उपस्थितीत 2 तासांत हा सोहळा उरकायचा आहे. सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, त्यांचे नियमित संचालन सुरू राहणार आहे.

मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने 24 तास सुरू राहणार आहेत. मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांना पेट्रोल आणि डिझेल वितरीत केले जाईल. सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी अत्यावश्यक कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुक्त होण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टीचा समावेश करा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Coronavirus: पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; बाधित आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ