CM Eknath Shinde Total Property : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमित ठाकरे, युगेंद्र पवार यांसह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अर्ज भरतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून एकनाथ शिंदे यांनी एकूण संपत्ती जाहीर झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदेंनी मोठे शक्तिप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रातून संपत्तीची माहिती नमूद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे हे 2019 साली राज्याच्या नगरविकास विभागाचे मंत्री होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 11 कोटी इतकी होती. यंदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे, 2024 ला मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत किती पटीने वाढ झाली याबद्दलची माहिती समोर आली आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये एवढी आहे. 2019 च्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपये कर्ज असून त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचं कर्ज आहे.
जिल्हा – ठाणे
मतदारसंघ – कोपरी पाचपाखाडी
नाव – एकनाथ शिंदे
वय – 60
पक्ष – शिंदे सेना
शिक्षण – बी. ए.
संपत्ती 2024 – 37,68,58,150
संपत्ती 2019 – 11,56,72,466
दाखल गुन्हे – 18
गंभीर गुन्हे – ००
कास्ट – मराठा
जंगम – 1,44,57,155 – पत्नी – 7,77,20,995 – एकूण – 9,21,78,150
स्थावर – 13,38,50,000 – पत्नी -15,08,30,000 – एकूण – 28,46,80,000
कर्ज – 5,29, 23,410 – पत्नी – 9,99,65,988 रुपये एवढं आहे.