Harshvardhan Patil Joined Sharad Pawar : लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने आता इंदापुरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच आता इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हे देखील व्यासपीठावर हजर होते.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करताच जोरदार भाषण केले. 10 वर्षात इंदापूरमध्ये खूप अन्याय झाला. कोणतेही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. त्यामुळे इंदापुरात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. काल बिग बॉसचा निर्णय झाला आणि बिग बॉस बारामतीचा झाला. साहेब तुम्ही बिग बॉस आहात. साहेब तुम्ही निर्धास्त राहा आम्ही जबाबदारी स्वीकारतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.
“ताई माझी विनंती आहे की, तुमच्या लोकांनी मला समजून घ्यावे. साहेब कधी आमच्या कुटुंबावर बोलले नाहीत. आम्ही कधी त्यांच्यावर बोललो नाही. आमचं दुखणे वेगळं होतं ते बाजूला गेलं. जयंत पाटील म्हणायचे का थांबला आहात या इकडे. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आणि आम्ही सगळ्यांनी पक्ष प्रवेश केला. आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही. जी जबाबदारी आमच्यावर टाकायची आहे ती टाका. आत-बाहेर करणाऱ्यांपैकी मी नाही. मला लोकांनी विचारलं पक्ष का बदलला? पक्षापेक्षा जनता श्रेष्ठ. जनतेनं जे मला सांगितलं ते आजपर्यंत मी केलं”, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.
“देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचण सांगितल्या त्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यांनी सांगितले, हे देतो ते देतो..पण त्यांना सांगितले आमची लोकं त्या पलीकडे गेली आहेत”, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.