Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. एकीकडे विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज जाहीर होत असताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत वाद समोर येत आहेत. महाविकासआघाडीकडून आतापर्यंत २०० पेक्षा जास्त उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र कल्याण पूर्व मतदारसंघावरुन सध्या काँग्रेस आणि ठाकरे गटात नवा वाद निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवसाचा कालावधी उरला आहे. पण तरीही कल्याण पूर्व मतदारसंघातील उमेदवार कोण याबद्दल संभ्रम कायम आहे. कल्याण पूर्वेतून ठाकरे गटाने महायुतीचा उमेदवार म्हणून धनंजय बोडारे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांना ए बी फॉर्मही देण्यात आला आहे. पण तरीही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्या वाट्याला येण्याची आशा वाटत आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे हे गेल्या २४ वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेने गेल्या तीन वेळा विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी सचिन पोटे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. मात्र ठाकरे गटाने महाविकासआघाडीला विश्वासात न घेता कल्याण पूर्वेत आपल्या उमेदवाराला परस्पर ए बी फॉर्म दिला आहे. मात्र सोमवारपर्यंत यात नक्की बदल होईल, असे सचिन पोटे यांनी म्हटले.
येत्या सोमवारी महाविकासआघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आली. त्यानंतर आपण उमेदवारी अर्ज दाखल करु, असा दावा सचिन पोटे यांनी केला आहे. गेली १५ वर्षे कल्याण पूर्व भागाचा विकास रखडला आहे. या मतदार संघात पाण्याची समस्या आहे. तसेच वीजेच्या लपंडावानेही नागरिक त्रस्त आहेत. आरोग्याच्या सोयी नसून शैक्षणिक सुविधा, मैदाने नाहीत. उखडलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असतानाच गुन्हेगारी वाढली आहे. नशा गांजा आणि डान्सबार वाढले आहेत. कारण लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर नियंत्रण नाही. यामुळे मतदारांमध्ये लोकप्रतिनिधीबद्दल राग असून संविधान धोक्यात आले आहे. यामुळेच मतदार कपट नीती आणि विश्वास घाताच्या राजकारणाचा या निवडणुकीत नक्कीच राग काढत महाविकास आघडीच्या बाजूने कौल देतील असा विश्वास ठाकरे गट उमेदवार धनंजय बोराडे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांना या मतदारसंघात अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. पण तरीही महाविकासाआघाडीत धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातील उमेदवाराबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत उमेदवार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकासआघाडीतून ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असला तरी येत्या सोमवारी काँग्रेस अधिकृत उमेदवार जाहीर करणार असल्याचे बोललं जात आहे.