Kalyan East Constituency : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांच्या जागी निलेश शिंदे यांची कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेना शिंदे गटातील कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नुकतंच काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांची हकालपट्टी करण्यात आली होती. महेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जागी कल्याण पूर्व शहरप्रमुखपदी निलेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ही घोषणा केली.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी महायुती उमेदवाराविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या रिक्त असलेली पदे भरून पक्षाच्या संघटनेला बळकट करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी आयोजित केलेल्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयातील कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली. या घोषणेनुसार, निलेश शिंदे यांची शहरप्रमुखपदी, प्रशांत काळे यांची विधानसभा प्रमुखपदी तर कृष्णा साळुंखे यांची उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय उपविभाग प्रमुखपदी राजाराम आव्हाड आणि उप शाखाप्रमुखपदी संतोष गवारे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या.
पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी नव्या संघटनेला एकजूट आणि समर्पणाने पक्षाचे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोंबिवलीतील सभेत उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पालांडे, कामेश जाधव, सत्यवान खेडेकर, महेंद्र एटमे, आणि अनंत आंब्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, अरुण आशान, रमाकांत देवळेकर, मनोज चौधरी, माजी नगरसेविका माधुरी काळे आणि इतर अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते. या नवीन नियुक्त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरत असून यामुळे पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.