मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवारही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून बारामतीच्या कसब्यातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे. अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार मैदानात उतरले असून शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मनसे कडून ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमित ठाकरे हेही आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माढ्यात आज आमदार बबनराव शिंदेचे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये सुरक्षा दलांनी शोध मोहिमेत एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. लष्कराने सांगितले की, एका दहशतवाद्याचा मृतदेह शस्त्रांसह जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये पीडब्ल्यूडी अभियंत्यांकडून २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 17ए अंतर्गत खटला चालवण्यास नायब राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पीडब्ल्यूडीच्या 5 अभियंत्यांच्या विरोधात चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संतुक मारोतराव हुंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. नांदेड लोकसभा जागेसाठी 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने आता त्यांच्या मुलाला या जागेवरून उमेदवारी दिली आहे.
उमेदवारी दाखल करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले की, मला खूप आनंद झाला आहे. इथले लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. इथलं वातावरण खूप चांगलं आहे. ही विक्रमी निवडणूक ठरणार आहे. हे निवडणुकीचे वातावरण नसून उत्सवाचे वातावरण आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्त्यांकडून गोपाळ शेट्टींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत. भाजपने शेट्टी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गोपाळ शेट्टी आता काही वेळात आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ शेट्टी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दाखल करू शकतात. गोपाळ शेट्टी यांचे समर्थक रस्त्यावर झोपून आंदोलन करत आहेत.
त्यांची मशाल क्रांतीची नाही तर राज्याला आग लावणारी आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रोहित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रोहित पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शक्ती प्रदर्शन केलं. कर्जत शहरातील अक्काबाई चौकातून भव्य रॅलीला सुरुवात झाली. तर या रॅलीचा समारोप सभेच्या ठिकाणी होणार आहे. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे आणि अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंह राजे होळकर हे उपस्थित राहणार आहेत.
महायुतीचे पनवेल विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार प्रशांत ठाकुर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रशांत ठाकुर यांनी याआधी मोठं शक्ती प्रदर्शन केलं.
अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेनेने उमेदवारी दिलेले भाजप नेते मुरजी पटेल यांनी शक्ति प्रदर्शन करत उमदेवारी अर्ज दाखल केला. आपण विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
कागल विधानसभा मतदारसंघातील मंडलिक गटाचे बंड थांबलं. वीरेंद्र मंडलिक उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. वीरेंद्र मंडलिक यांचे वडील माजी खासदार संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली. मंडलिक आणि मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलन झालंय.
बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार दिलीप मोहिते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मोहिते पाटील यांना पत्नी सुरेखा मोहिते यांनी औक्षण केलं. त्यानंतर वसुबारस निमित्त गोमातेची पूजा करत लाडक्या बापाचं दर्शनही घेतलं, यावेळी माध्यमांशी बोलताना मोहिते पाटील यांनी आजही विरोधकांना माझ्या विरोधात उमेदवार मिळत नाही ते काय माझं भविष्य सांगणार? असे ते म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केदार दिघे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाणे कोपरी पाचपखाडी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यानिमित्ताने आज वागळे इस्टेट ते किसान नगर अशी भव्य मिरवणूक करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत अनेक महिला या मुख्यमंत्र्यांचे औक्षण करतील. त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे वंशज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभ आशीर्वाद देणार आहेत. त्यामुळे ही जरी नामांकन रॅली असली तरी आम्ही त्याला विजयी मेळावा मानत असल्याचे शिवसेना अध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले.
धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. आमदार कुणाल पाटील यांनी सहपरिवार आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घेतले. यानंतर कुणाल पाटील मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सिंधुदूर्ग- कणकवली देवगड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नितेश राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी राणेंनी सहकुटुंब त्यांच्या गावातील ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. यावेळी गावातील मानकऱ्यांनी आमदार नितेश राणे हे सलग तिसऱ्यांदा विजयी व्हावेत असे ग्रामदेवतेच्या चरणी साकडे घातले.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आज भरणार उमेदवारी अर्ज आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संजय शिरसाट यांना चौथ्यांदा पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पत्नी आणि मुलीकडून औक्षण करून संजय शिरसाठ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. आज शक्ती प्रदर्शन करत संजय शिरसाठ भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
नाशिक पश्चिम मतदार संघातून दिनकर पाटील मैदानात… पत्नीने आणि परिवारातील महिलांकडून दिनकर पाटील यांचे औक्षण… थोड्याच वेळात रॅली काढत भरणार उमेदवारी अर्ज
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दहशतवाद्याच्या एका सहकाऱ्याला अटक… अटक केलेल्या व्यक्तीकडून १ पिस्तूल, दोन मॅगजीन, 12 राउंड आणि एक मोबाइल फोन यासह काही आपत्तिजनक साहित्य, हत्यार आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
युगेंद्र पवार यांच्या निवास्थानी कुटुंबियांकडून तयारी…कुटुंबियांकडून युगेंद्र पवार यांना केलं जात आहे औक्षण… कण्हेरी मारुतीचे दर्शन घेऊन युगेंद्र त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार… अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे राहणार उपस्थितीत…
भाजपाचे उमेदवार राहुल ढिकले, सीमा हिरे आणि देवयानी फरांदे करणार उमेदवारी अर्ज दाखल… भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी विनोद तावडे देखील राहणार उपस्थित… तर देवळाली मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सरोज अहिरे देखील आजच भरणार आपलं उमेदवारी अर्ज… शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गीते देखील आज शिवसेना कार्यालयापासून रॅली काढत करणार उमेदवारी अर्ज दाखल…
सुशील महाजन यांना शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने ते करणार होते अपक्ष उमेदवारी… धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये अपक्ष उमेदवारी करण्यासाठी आज करणार होते अर्ज दाखल… मात्र मातोश्रीचा आदेश आल्याने उमेदवारी न दाखल करण्याचे संकेत… शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फोनवर केली चर्चा..
महेश गायकवाड याचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहिल्यास शिवसेना शिंदे गट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार कारवाई होणार. शिवसेना शिंदे गटच्या जिल्हाप्रमुखानी पदाधिकारी नगरसेवकांना आदेश दिले आहेत
महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख असून आज ते कल्याण पूर्वेत अपक्ष उमेदवारी भरणार आहेत. मात्र महायुतीकडून कल्याण पूर्व येथे भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेतून बंडखोरी करत महेश गायकवाड अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आहेत.
अमरावतीत आमदार रवी राणा विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रवी राणांनी माझ्या विरोधात दर्यापूर मतदारसंघात उमेदवार दिल्यास त्यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देऊ , असा इशारा अभिजित अडसूळ यांनी दिला आहे.
महायुती धर्म न पाळल्यास राणा यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, असं त्यांनी सुनावलं.
बारामती – आर. आर. पाटील यांचे चिरंजीव, कवटे महाकाळ गटातील शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील हे शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी वागळे इस्टेट, मॉडेला चेकनाका येथील दत्त मंदिर ते किसन नगर आयटीआय इमारतीपर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार असून शक्तीप्रदर्शन करण्यात येईल.