मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील विधानसभेसाठीचे उमेदवार ठरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सध्या गावभेट दौरा सुरु आहे. बारामतीतील गावांना अजित पवार भेटी देत आहेत. या गावभेटींमध्ये अजित पवार भावनिक आवाहन करत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अमित घोडा 40 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठीचं प्रचाराचं नारळ फोडलं आहे. कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा आज आयोजित करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलकांची पुन्हा बैठक सुरु झाल्याची माहिती आहे. मनोज जरांगे आता विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
झारखंडमधील घाटशिला येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, तुम्ही सरकार बनवून द्या, भाजप सरकार घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम करेल. ही निवडणूक सरकार बदलण्याची निवडणूक आहे.
सुनील शर्मा यांची जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. सुनील शर्मा किश्तवाडमधून भाजपचे आमदार आहेत.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या येत आहेत. श्रीनगरच्या ‘संडे मार्केट’मध्ये निष्पाप दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणेने हल्ल्याची ही लाट लवकरात लवकर संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून लोकांना कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगता येईल.
पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ संध्याकाळी उशिरा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर तुम्ही रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेऊ शकतात.
लातूर -उदगीर मतदार संघात भाजपा बंडखोर उमेदवार विश्वजित गायकवाड यांनी अखेर माघार घेतली आहे,मंत्री संजय बनसोडे यांनी फडणवीस यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर विश्वजित गायकवाड यांची माघार घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड मध्ये जेवण बनवण्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मुकेश हिरा कुशवाह या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.दिपू कुमार अस हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ काल रात्री भरधाव बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या 3 मोटरसायकलींना चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मावळ,पुणे- ढोल ताश्यांच्या गजरात सुनील शेळके यांनी शक्तीप्रदर्शन केलं. फुलांची उधळण करत, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मावळ विधानसभा महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी प्रचंड जनसमुदाय शेळके यांच्या समवेत होता, तर पारंपरिक ढोल ताशाचा गजर करत वडगांव मावळातील ग्रामदैवत पोटोबा महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांनी आशिर्वाद घेतले.
“माझी प्रतीमा मलिन करण्यासाठी अनेक आरोप झाले. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करणार. माझी लढाई भाजप आणि शिंदे गटासोबत देखील आहे. मला निवडणूक लढायची नव्हती,” असं नवाब मलिक म्हणाले.
“उद्धव ठाकरे हे पक्षाचे तिकीट विकतात. 2005 ला राणे साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा एक महत्त्वाचं सत्य सांगितलं होतं. आजही तेच सुरु आहे. उद्धव ठाकरे गटात जी बंडखोरी सुरू आहे त्याचं कारण हेच आहे. जो मातोश्रीकडे बॅगा पोहोचवेल त्याला तिकीट मिळणार. राऊतांनी सकाळी उठून बंडखोरीबाबत किती आव आणला तरी प्रामाणिक शिवसैनिकांवर उद्धव ठाकरेंच्या व्यापारामुळे अन्याय होत आहे. तिकिटांचं ऑक्शन आजही थांबलेलं नाही,” अशा शब्दांत नितेश राणेंनी टीका केली.
“राज्यात सर्वात जास्त निधी बारामतीला दिलाय. लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधक वाटेल ते बोलत आहेत. विरोधकांकडे ठोस मुद्दा राहिला नाही, त्यामुळे विरोधक काहीही टिका करत आहेत. गावागावात अनेक महिला दारूबंदी करण्याची मागणी करत आहेत,” असं अजित पवार म्हणाले. दारूबंदी करावी यासाठी शिरसुफळ येथील महिलांनी अजित दादांना चिठ्ठी दिली. त्यामध्ये अवैध दारूचा व्यवसाय चालविणाऱ्या लोकांची दादांनी नावेच वाचून दाखविली.
उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या विधानावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समज-गैरसमज बाजूला ठेवून महायुतीतील उमेदवार कसा जिंकेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. सर्व विषय बाजूला ठेवून हे काम केल्याशिवाय महायुतीचा उमेदवार प्रत्येक ठिकाणी जिंकून येणार नाही,” असं ते म्हणाले. जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री होतो असं विधान उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलं होतं.
कुणाकडून राजीनाम्याचे बाँड लिहून घेतले नाही. आम्ही इतक्या खालच्या थराला जात नाही. कुणाला जायचं तर जाऊ द्या. काही म्हमाले व्हीप पाहिजे. मी नाही म्हटलं. मराठे हेच व्हीप आहेत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जिथे ताकद आहे तिथे जोर लावायचा. जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा. फक्त एससी एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल, असे संजय राऊत म्हणाले. या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं आपण पहाल. कोण काय बोलताय कोणाचे काय दावे आहेत हे आता कशाकरता आधी जिंकून या, अजित पवारांसह आधी सर्व जिंकून या, बारामती आता सोपी राहिलेली नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मला जितेंद्र आव्हाड यांना सांगायचे आहे तुम्ही अनेक वेळा चुकीचे विधान केल्यामुळे अडचणीत आले आहेत. शब्द विचारपूर्वक वापरले पाहिजे कुणाला काय बोलतो याचा विचार केला पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या राजकीय आयुष्यमध्ये पुढे आणण्यासाठी जसे शरद पवारांचे हात आहे तसे छगन भुजबळ यांचे देखील आहेत त्यांना हे माहिती आहे, असे भुजबळ म्हणाले.
उल्हासनगर येथील भाजप जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याने एकच वाद पेटला आहे. ज्यांना गद्दार म्हणतात ते मुख्यमंत्री होतीत, असे वक्तव्य जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
ययाती नाईक भाऊ इंद्रनील विरुद्ध उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समोर येत आहे. मुंबईत वसंतराव नाईकांचे पुत्र अविनाश नाईक यांनी चर्चा केल्यानंतर ययाती उमेदवारी मागे घेणार असल्याचे समजते. कारंजा मधून मात्र ते निवडणूक लढणार आहेत. अविनाश नाईक प्रचाराला येणार आहेत. या घडामोडींमुळे नाईक घराण्यातील फूट टळली आहे.
पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी भरलेले माजी आमदार अमित घोडा कालपासून नॉट रीचेबल असल्याचे सांगण्यात येतेय, पालघर विधानसभेसाठी महायुतीच्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले भाजपमधील अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचां शेवटचा दिवस असून अमित घोडा निवडणुकीवर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपूर्वीच कुटुंबीयसह अज्ञातवासात गेल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमधील येवल्यात एस.एस.मोबाईलचे दुकानाचे शटर तोडून दुकानातून अंदाजे 1 लाख रुपये रोख विविध कंपन्यांचे सुमारे एक कोटी रुपये किमतीचे मोबाईल व विविध साहित्य चोरून नेले जात होते. सीसीटीव्ही सेंसरद्वारे मालकाला कॉल जाताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. चोरट्यांनी चोरी केलेला मुद्देमाल तिथेच टाकून पळ काढला. मात्र रोख रक्कम व दोन महागडे डेमो मोबाईल असा एक लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत गीते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सभांचे नियोजन करण्यासाठी ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले आहेत.
जिंकलेल्या जागा कोणी सोडायला तयार नसते. सांगोल्याची जागा आमची आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे, सर्व चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बारामती विधानसभेची जागा आता सोपी राहिली नाही. अजित पवार यांना या ठिकाणी कडवी लढत मिळणार आहे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अजित पवार सध्या बारामतीत गावभेट दौरा करत आहेत. यावेळी आज भाऊबीजेनिमित्त ओळाळलं. मला लाडक्या बहिणीनी सकाळी ओवाळलं आहे. त्यामुळे मी भाऊबीजला जाणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
आज अंतरवाली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे. या ठिकाणी राज्यभरातून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येकजण आला आहे. मनोज जरांगे पाटील घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. तसेच मलाच का तिकीट दिले पाहिजे, आशा भावना यावेळी आलेल्या उत्सुक उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत गीते संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच आगामी नाशिक मध्ये होणाऱ्या सभांच नियोजन साठी संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. भाजपच्या देवयानी फरांदे आणि वसंत गीते अशी लढत नाशिक पश्चिम मतदार संघात होणार आहे.
सोलापुरातील महायुतीचे शहर मध्यचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याकडून युतीतील नाराज नेत्यांच्या भेटीगाठी सुरुवात झाली आहे. शहर मध्यचे इच्छुक उमेदवार अनंत जाधव आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दिलीप कोल्हे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी कोठेंनी घरी जात नाराजी दूर केली. शहर मध्यमधून भाजपचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव हे इच्छुक होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अनंत जाधव यांनी माघार घेतली होती. तर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख दिलीप कोल्हे यांनीही शहर मध्यची जागा शिवसेनेला मागितली होती. मात्र शहर मध्यची जागा भाजपला गेल्याने कोल्हे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र देवेंद्र कोठे यांनी दोन्ही नेत्यांची नाराजी दूर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.