कुठे ईव्हीएम बंद, तर कुठे बिघाडाचे ग्रहण; राज्यभरात मतदारांचा खोळंबा

| Updated on: Nov 20, 2024 | 8:34 AM

आता काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत ईव्हीएम मशीन बंद झाले आहे. त्यामुळे अनेक मतदारांचा खोळंबा झाला आहे.

कुठे ईव्हीएम बंद, तर कुठे बिघाडाचे ग्रहण; राज्यभरात मतदारांचा खोळंबा
evm machine
Follow us on

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र त्यातच आता काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. राज्यात काही मतदारसंघात मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे.

मालेगाव बाह्यमध्ये ईव्हीएम मशीन बंद 

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात बूथ क्रमांक 292 या ठिकाणी असलेले ईव्हीएम मशीन बंद पडले आहे. या बूथवर असलेले ईव्हीएम मशीन हे इनव्हॅलिड दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मालेगावातील अनेक मतदार हे ताटकळत असल्याचे दिसत आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे आहेत. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा होत आहे.

नाशिकमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

तर दुसरीकडे नाशिकमधील पंचवटी परिसरातील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथवर तांत्रिक बिघाड झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमधील मतदान हे 20 मिनिटे उशीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मतदानासाठी गेलेल्यांचा खोळंबा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

जळगावात ईव्हीएम मशीन बंद

तसेच जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याने अनेकांचा गोंधळ झाला. ईव्हीएम मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला 15 ते 20 मिनिटे विलंब झाला. हे ईव्हीएम मशीन सुरु व्हावे यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांनी मशीन सुरु झाल्यावर त्याला सील करण्यात आले. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते.

दरम्यान संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष यंदा विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर अपक्ष 2 हजार 086 उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल.