राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शरद पवार हे अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, मंत्री शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत असताना तरुण कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साथ दिली. विशेष म्हणजे शरद पवार गटातील अनेक तरुण चेहरे देखील संकटकाळात शरद पवार यांच्यासोबत राहीले. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून देखील यंदाच्या निवडणुकीत तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची ‘यंग ब्रिग्रेड’ मैदानात उतरली आहे. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीत तरुण चेहऱ्यांची संख्या अधिक आहे. शरद पवार हे १९७८ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. पक्ष फुटीनंतर यंदाची निवडणूक ही पक्षासाठी महत्त्वाची असताना पक्षाकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. विविध पक्षांचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. यापैकी अनेक नेत्यांना शरद पवारांनी त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपातून शरद पवार गटात आलेले समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील या दिग्गज नेत्यांनादेखील शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. हे नेते निवडून आले तर महायुतीला मोठा फटका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने राज्यात 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाली होती. साताऱ्याच्या जागेचा अवघ्या काही मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला.