PM Narendra Modi Pune Visit : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला जात आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण महाराष्ट्रात सभा पार पडताना दिसत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. आज सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. या निमित्ताने महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा टिळक रोडवरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
तसेच बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात बंदी असणार आहे. टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून नुकतंच पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे.
यामुळे लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. तसेच विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तासाठी असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
तसेच पुण्यात मोदींच्या सभेदरम्यान ड्रोन उड्डाणास बंदी असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंगळवारी शहरात ड्रोन कॅमेरे, तसेच पॅराग्लायडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. पुण्यातील अनेक रस्त्यांवर मोदींच्या स्वागताचे बॅनर पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी हुकलेल्या सभेची कसर या सभेच्या माध्यमातून भरून काढण्याचा निर्धार भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.