Rajan Teli Resign Reason : कोकणातील भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. संध्याकाळी 4 च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात राजन तेली विरुद्ध मंत्री दीपक केसरकर यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीची लढत होईल, असे बोललं जात आहे. राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्यामागचे कारण सांगितले आहे.
राजन तेली यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजप सोडण्याबद्दल आणि नारायण राणे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले. यावेळी त्यांनी “मी भाजपच्या कोणत्याही नेत्यावर नाराज नाही. भाजपमध्ये खूप प्रेम मिळालं”, असेही जाहीरपणे सांगितले.
“मी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलो ही त्यावेळी मी केलेली चूक होती. आम्ही शिवसेनेमुळेच नावारुपाला आलो. आज आमच्या नेत्यावर अन्याय झाला, म्हणून आम्ही त्यावेळी पक्षप्रवेश केला. पण आज मी माझी ही चूक दुरुस्त करतो. नितेश राणे हे सातत्याने कुरघोडी करायचे, ते आम्हाला मतदारसंघात काम करु देत नव्हते. मी याबद्दल वरिष्ठांना कळवलं आहे. मी जिल्हाध्यक्ष म्हणून राजीनामा दिल्यानतंर या गोष्टी सुरु झाल्या. पण या गोष्टीला कितीतरी वेळा संधी दिली, पण तरीही मुद्दाम या मतदारसंघात लोकांना भडकवण्याच्या गोष्टी सुरु झाल्या. मी अनेक गोष्टी आहेत, पण त्या आज मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी या सर्व गोष्टींना कंटाळूनच भाजपचा राजीनामा दिला”, असे राजन तेली म्हणाले.
“मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही अशाच प्रकराचा त्रास देण्यात आला. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. मी भाजपवर किंवा त्यांच्या नेत्यांवर नाराज नाही. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार यांनी मला खूप प्रेम दिलं. मी या कोणावरही नाराज नाही. त्या उलट मी आज माफी मागतो. पण आज माझा नाईलाज होता आणि गेल्या वर्षभरापासून जे काही घडतं होतं. त्यावेळी आपण कुठेतरी थांबलो पाहिजे, अशी भावना होती. त्यामुळे मला आजचा हा निर्णय घ्यावा लागला”, असेही राजन तेलींनी यावेळी म्हटले.