देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित? आजच होणार शिक्कामोर्तब

| Updated on: Nov 25, 2024 | 1:29 PM

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देवेंद्र फडणवीसांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित? आजच होणार शिक्कामोर्तब
देवेंद्र फडणवीस. भाजप नेते
Image Credit source: Facebook
Follow us on

Maharashtra New CM : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून महाविकासआघाडीची गोची झाली आहे. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यातच आता मुख्यमंत्रि‍पदासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. महायुतीत भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असावा आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी अनेक कार्यकर्ते आग्रही आहेत. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपला राज्यात मोठं यश मिळालं आहे, अशा भावनाही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे आज नवी दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याबद्दल महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळी महायुतीच्या नव्या सरकार बाबतची रुपरेषा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी फॉर्म्युला काय?

मुख्यमंत्रिपदाच्या 2 फॉर्मुल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युलासाठी शिंदे गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील पहिला फॉर्म्युलामध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भाजपकडे असेल. तर त्यानंतरचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे असेल. तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी 2-2-1 अशा फॉर्म्युलावरही चर्चा सुरु आहे. या फॉर्म्युलानुसार भाजपकडे दोन वर्षे, शिंदे गटाकडे दोन वर्षे आणि अजित पवारांकडे एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल. या फॉर्म्युलासाठी अजित पवार गट हा प्रचंड आग्रही आहे.

राज्यात महायुतीची सत्ता

दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. सध्या महायुतीच्या गोटात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.