महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज परळीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडली, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवार यांची ही परळीमध्ये पहिलीच सभा होती. ते या सभेत काय बोलणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
परळीने जीवा भावाचा सहकारी दिला होता, महाराष्ट्राला वीज देण्याचं काम या परळीतून होतं
अलीकडच्या काळात परळीला काय झालं आहे ते माहीत नाही परळीत गुंडागिरी वाढली आहे. काही लोकांना राजकीय संकटाच्या काळात मदत केली होती. बीड जिल्ह्याने सर्व आमदार निवडून देण्याचं काम मला दिले होते, दुर्दैवाने आता परिस्थिती बदलली सत्ता आल्यानंतर सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नाही, मात्र काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली. लोकांना त्रास देणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत पवार यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील गुंडागिरी थांबावी, बीड जिल्ह्यातील शेतीचे पाण्याचे प्रश्न सोडवावेत. तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी तुमची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करा. पक्ष संकटात आहे, अनेक अडचणी आहेत. पक्ष फोडण्यात तीन लोक प्रामुख्याने होते, त्यात कोण लोक होते हे विसरण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी परळीमधून महायुतीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी महाविकास आघाडीकडून धनंजय मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यांनी माहयुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. राज्यातील ज्या काही प्रमुख विधानसभेच्या लढती आहे, त्यामध्ये या मतदारसंघाचा देखील समावेश होतो.