राज्यातील विधानसभा निवडणुकांची अद्याप घोषणा झाली नसली तरी येत्या दोन-तीन महिन्यांतच निवडणुकांचे पडघम वाजतील. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. कल्याण -डोंबिवलीतील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातही वातावरण तापलं असून या जागेसाठी महायुतीतील दोन पक्ष इच्छुक असल्याने नवा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. मात्र आगामी निवडणुकीमुळे कल्याण पश्चिम मतदारसंघात बंडाळी होऊ शकते. याच मतदारसंघाचे नेतृत्व करणार तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महायुतीमध्ये कल्याण पश्चिम विधानसभेची जागा कोणाकडे ?
सध्या शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे कल्याण पश्चिम मतदारसंघात आमदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यावर आमदार भोईर हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाने या मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला आहे. मात्र इतरही अनेक जण यासाठी इच्छुक आहेत. या मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे अनेक इच्छूक असल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवस निम्मित कल्याण पश्चिमेत भाजप माजी आमदार असलेल्या नरेंद्र पवार यांची भावी आमदार म्हणून बॅनरबाजी सुरू आहे.
2019 साली झालेल्या विधानसभा निवणुकीत महायुतीत असताना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता यंदा तरी भाजपाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येते का की शिंदे गटाचेच या मतदारसंघावर वर्चस्व राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे