बाळासाहेबांबद्दल आदर ते मोदींना खुलं आव्हान, शिर्डीमध्ये प्रियंका गांधी बरसल्या

| Updated on: Nov 16, 2024 | 4:20 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. शिर्डीमध्ये आयोजित सभेत प्रियंका गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांबद्दल आदर ते मोदींना खुलं आव्हान, शिर्डीमध्ये प्रियंका गांधी बरसल्या
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची शिर्डीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेमधून त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच बाळासाहेब आणि आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी त्यांच्याबद्दल कायम आदर वाटतो असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांंधी?  

शिर्डीच्या प्रचार सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रासोबत भेदभाव सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग दुसरीकडे पाठवले जात आहेत. माझ्या समोर इथे अनेक माता बसल्या आहेत, कोणाला दोन मुलं असतील कोणाला तीन-चार मुलं असतील तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कधी भेदभाव करता का? सरकार देखील आपल्या आई-वडिलांसमान असते मग हा भेद भाव का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि हे सभेमध्ये म्हणतात महाराष्ट्राला मजबूत बनवायचं आहे. प्रचार अजून संपला नाही तोच पंतप्रधान हे विदेश दौऱ्यावर गेले. मी मोदींना आव्हान देते की त्यांनी अमित शाह यांना जातनिहाय जनगणना करायला लावावी.

पंतप्रधान मोदी सभेत म्हणतात की तेव्हा दुसरं सरकार होतं आता मोदींचं सरकार आहे. देशात दहशत हा शब्द देखील ऐकायला मिळत नाही, मात्र तुम्ही इथल्या महिलांशी एकदा संवाद साधला म्हणजे तुम्हाला कळेल की त्या किती दहशतीखाली जीवन जगत आहेत, हीतीच महागाईची दहशत आहे. सर्वच गोष्टींचे एवढे भाव वाढले आहेत की, यावर्षी दिवाळी देखील महिलांना साजरी करता आली नाही, असा हल्लाबोल यावेळी प्रियंका गांधी यांनी केला आहे.