“…पण यांना सुपरमॅन व्हायचे आहे”, एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला

| Updated on: Oct 16, 2024 | 1:02 PM

यात क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

...पण यांना सुपरमॅन व्हायचे आहे, एकनाथ शिंदेंचा जबरदस्त टोला
Follow us on

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला. यावेळी महायुती सरकारकडून आगामी विधानसभेचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला. यात क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टींचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. त्याचीही टिंगल केली. कोर्टात गेले. तुम्हाला एवढी पोटदुखी आणि जलसी होते, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

“डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे”

“आज अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. या योजना पाहिल्यानंतर ते बिथरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांचं अवसान गळालं आहे. त्यांना एकप्रकारे डोळ्यासमोर पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच ते उलट सुलट आरोप करत आहेत. त्यांनी जे काही आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी एक तरी आरोप खरा सांगायचा होता. कशाचा काहीही संबंध जोडत आहेत. ते एवढे बिथरले असतील तर कसं काय होणार? म्हणून ते सतत CM CM CM करतात आणि आम्ही लोकांसाठी काम काम काम करतोय”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“कॉमन मॅन न राहता सुपरमॅन झाला पाहिजे”

“आम्ही टीम म्हणून काम करतो. राज्यातील सर्वसामान्य माणूस कॉमन मॅन याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे. त्याच्या जीवनात बदल व्हायला पाहिजे. तो कॉमन मॅन न राहता सुपरमॅन झाला पाहिजे. पण यांना स्वत:ला सुपरमॅन व्हायचं आहे. पण किती सुपरमॅन होणार एक, दोन, तीन, चार, पाच… एकदा किती ते ठरवा. आम्हाला आमच्या सर्वसामान्य माणसाला कॉमन मॅनला ताकद द्यायची आहे. त्यामुळेच आम्ही लाडकी बहीण योजना आणली. त्याचीही टिंगल केली. कोर्टात गेले. तुम्हाला एवढी पोटदुखी आणि जलसी होते. कारण लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.