शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची सोमवारी वणीमध्ये हेलीपॅडवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली आहे. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांची उलट तपासणी केल्याचं पहायला मिळालं. उद्धव ठाकरे हेलीपॅडवर उतरले असता अधिकाऱ्यांनी त्यांना बॅगेची तपासणी करायची आहे असं सांगितलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्या अधिकाऱ्यांना त्यांचं आयकार्ड दाखवायला सांगितलं. आयकार्ड पाहिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी केली. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात याची देखील चौकशी केली. त्यानंतर तुम्ही तुमचं पाकीट देखील दाखवा त्यात किती पैसे आहेत असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
दरम्यान कधीपासून नोकरी करत आहात? आतापर्यंत किती जणांना तपासलं असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला, तेव्हा तुम्ही पहिलेच आहात असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तेव्हा मीच आहे का पहिलं गिऱ्हाईक असा खोचक टोला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. सगळ्यांची नावं आली आहेत माझ्याकडे आता तुम्हाला टीव्हीवर चांगली प्रसिद्धी मिळेल असंही उद्धव ठाकरे यांनी या अधिकाऱ्यांना म्हटलं.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधाला. त्यांच्या बॅगेची तपासणी का होत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.