विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अमरावतीच्या प्रचार सभेमध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सुख मे जो साथ देते है वह रिश्ते होते है, जो दुःख मे साथ देते है वह फरिश्ते होते है,’ या शेरोशायरीसह उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली, यशोमती ठाकूर माझी लाडकी बहीण आहे, त्यांना दुप्पट मतांनी निवडून आणलं पाहिजे असं आवाहनही यावेळी ठाकरे यांनी केलं.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्यांच्यावर संस्कार झाले नाहीत ते काहीही बोलतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, पण प्रत्येक वेळी बोलाल तर आम्ही इंगा दाखवणार असं नाही, फक्त ती वेळ यायची आहे, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आठ तारखेला जो चिन्हाचा निर्णय होणार होता, तो पुढे ढकलला आहे. न्यायाचा तमाशा आणि बाजार मांडला आहे यांनी. आता त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी सुद्धा काढली आहे. देवेंद्र फडणवीस बोलले संविधानाचं कव्हर लाल आहे, आपलं रक्त पण लाल आहे. आम्ही जेव्हा कर्जमाफी केली तेव्हा आम्ही कर्तव्य केले होते, जाहिरात केली नव्हती. असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेगे अशी या सरकारची निती आहे. जीएसटीचे पैसे देखील सरकारने खाल्ले. सर्व विकास उदयोग पळविण्यासाठी गुजरातला देण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. रोजगार, उदयोग कुठं गेले? तुम्ही रोजगारासाठी आता गुजरातला जाणार का? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकला तर विकास होईल, आमचं सरकार आलं तर दोघांना सुद्धा मोफत शिक्षण देणार अशी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.