Bandra east Vidhan Sabha : ‘मातोश्री’च्या अंगणात गुलाल कोणाचा? वांद्रे पूर्वमध्ये कोण मारणार बाजी?

| Updated on: Oct 22, 2024 | 2:50 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. सर्वच पक्षांनी कसून तयारी केली असून भाजपच उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर झाली आहे. उर्वरित पक्षांची यादीही याच आठवड्यात कधीही येऊ शकते. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात कशी आहे स्थिती ? जाणून घेऊया.

Bandra east Vidhan Sabha : मातोश्रीच्या अंगणात गुलाल कोणाचा? वांद्रे पूर्वमध्ये कोण मारणार बाजी?
'मातोश्री'च्या अंगणात गुलाल कोणाचा?
Image Credit source: social media
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकचा टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येते की महाविकास आघाडीचा विजय ठरतो हे आता महिन्याभरातच समजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला असून महायुतीमधील भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना ( शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची यादीही लवकरच जाहीर होईल. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असली तरी काही महत्वाच्या जागांवर अद्यापही तिढा न सुटल्याने मविआतर्फे कोणत्याच पक्षाने यादी जाहीर केलेली नाही.

याच दरम्यान वांद्रे पूर्व येथील मतदारसंघाची स्थिती काय आहे जाणून घेऊया.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान मातोश्री याच मतदारसंघात असल्यामुळे हा भाग शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा राहिला आहे. सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य आहे. मराठी मध्यमवर्ग तसेच हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचही इथे लक्षणीय प्रमाण आहे. या मतदारसंघात एकूण 254 मतदान केंद्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे.

2014 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळा सावंत विजय झाले होते. मात्र त्यांच्या निधानंतर 2015 मध्ये या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी तृप्ती सांवत या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे झिशान बाबा सिद्दीकी हे 38,337 मतं मिळवून विजयी ठरले. तर शिवसेनेचे विश्वनाथ पांडुरंग महाडेश्वर हे 32,547 मतं मिळवून दुसऱ्या स्थानी होते.

शिवसेना ठाकरे गटातर्फे वरूण सरदेसाईंना उमेदवारी ?

मविआतर्फे अद्याप जागावाटप आणि उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसली तरी गेल्या काही दिवसांपासून वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे. वरुण सरदेसाई या मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्यांची लढत ही आमदार झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात होऊ शकते. कारण विद्यमान आमदार असलेले झिशान सिद्दीकी लवकरच काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती, मात्र त्यासंदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

तर दुसरीकडे मविआतून ठाकरे गटाला ही जागा मिळण्याचीच शक्यता जास्त आहे. कारण काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एक मोठा दावा केला होता. शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई इच्छुक होते. मात्र ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज झाले होते. त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी खेळी केली जाण्याची शक्यता आहे. या मेळाव्यातून अनिल परब यांनी मोठा दावा केला. वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ते जिंकणार असा विश्वास मला आहे, असे अनिल परब यांनी म्हटले होते. त्यामुळे लवकरच वरूण सरदेसाईंची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.

सहानुभूतीचा फायदा मिळणार?

या मतदारसंघात पूर्वीपासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. मागच्या निवडणुकीत झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचं हे वर्चस्व मोडीत काढलं. आता शिवसेनेत फूट पडलेली आहे. राष्ट्रवादीतही फूट पडलेली आहे. मात्र, झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्या केली आहे. या घटनेला अजून 15 दिवसही उलटलेली नाही. बिश्नोई टोळीशी कसलाही संबंध नसताना किंव कोणतीही दुश्मनी नसताना बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याने या मतदारसंघात सिद्दीकी कुटुंबाबाबतची सहानुभूती आहे. या सहानुभूतीचा फायदा झिशान सिद्दीकी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच माजी आमदार तृप्ती सावंत या महायुतीत आहेत. त्याचा फायदाही सिद्दीकी यांना होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे वरुण सरदेसाई हे ठाकरे कुटुंबाशी संबंधित असल्याने ठाकरे कुटुंब ही जागा प्रतिष्ठेची करेल. त्यामुळे वांद्रे पूर्वमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते, असं जाणकारांचं मत आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघ विधानसभा 2019 निवडणूक निकाल

झिशान बाबा सिद्दीकी – काँग्रेस – 38 हजार 337 मतं

विश्वनाथ पांडुरंग महाडेश्वर – शिवसेना – 32 हजार 547 मतं

तृप्ती प्रकाश (बाळा) सावंत – अपक्ष 1 – 24 हजार 071 मतं

मोहम्मद सालीम कुरेशी – एआयएमआयएम – 12 हजार 594 मतं

अखिल अनिल चित्रे – मनसे – 10 हजार 683 मतं