“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांविरुद्ध उमेदवार देणार”, बच्चू कडू यांची मोठी घोषणा, म्हणाले “288 जागांवर…”

| Updated on: Sep 21, 2024 | 2:25 PM

बच्चू कडू यांनी नुकतंच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांविरुद्ध उमेदवार देणार, बच्चू कडू यांची मोठी घोषणा, म्हणाले 288 जागांवर...
Follow us on

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असून मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जात आहे. त्यातच आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी महायुतीविरोधातच दंड थोपटले आहे. बच्चू कडू यांनी नुकतंच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध उमेदवार देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेत फूट पडली. यावेळी बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात असे सांगत सरकारला 1 सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला होता. त्यानंतर आता बच्चू कडूंनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली.

शिंदे, फडणवीस, अजित पवारांविरुद्ध उमेदवार देणार

“आम्ही 18 मागण्या समोर ठेवल्या होत्या. मात्र त्यातील एकही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळेच आता आम्हाला विरोधात लढावंच लागेल. आम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या विरोधातही उमेदवार देऊ. आमची महाशक्ती आघाडी पूर्ण देशात आदर्श ठरेल. आम्ही पूर्ण 288 जागांवर निवडणूक लढवणार आहोत”, असे बच्चू कडू म्हणाले.

“आम्हाला कोणीही पाठिंबा देण्याची गरज नाही. राज्यात महाशक्ती आघाडीचा मुख्यमंत्री दिसेल. महाराष्ट्रातील जनतेला तिसरा पर्याय मजबुतीने देऊ. तसेच आम्हाला कोणालाही पाठिंबा देण्याची गरज पडणार नाही, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला. आमची महाशक्ती संपूर्ण देशात आदर्श ठरेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही आम्ही उमेदवार देऊ. विशेष म्हणजे आम्ही पूर्ण 288 जागांवर उमेदवार देऊ”, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

संजय राऊतांचा अभ्यास कमी

यावेळी बच्चू कडू यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी अभ्यास करून बोलावं. संजय राऊतांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे पीआर कार्ड नाही. संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे त्यांची जहागीरदार नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

“भाजपच्या हस्तक्षेपामुळे एकनाथ शिंदेंचे चार खासदार पडले”

“राज्यात इतर पक्षांनी काय दिलं हे माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर प्रसन्न आहे. पण निर्णय घेतले नाही. दोन्ही समाजाचे समाधान होईल असा तोडगा हा मराठा आरक्षणावर काढावा. महायुतीला आता अद्दल घडली. भाजपच्या हस्तक्षेपामुळे मूळ एकनाथ शिंदे यांचे चार खासदार पडले. मित्र बनून मानेवर सुरी लावण्याचे काम भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलं”, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.