Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील निवडणुका पार पडणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यातच आता काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीमध्ये 99 जणांचा समावेश आहे. भाजपने जाहीर केलेल्या या यादीनंतर काही उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काहीजण नाराज झाले आहेत. तसेच काही नेत्यांना उमेदवारी जाहीर झाली नसली तरी ते लढण्यावर ठाम आहेत. तर काहींची धुसफूस सुरु आहे. विशेष म्हणजे काही नेते बंडखोरी करत निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. यामुळे सध्या महायुतीच्या गोटात अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
बेलापूर विधानसभेत भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी यंदाची निवडणूक लढवायची असा निश्चय केला आहे. संदीप नाईक हे बेलापूरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. एकदा ठरलं की ठरलं आता माघार नाही, अशा आशयाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर झळकू लागले आहेत. त्यामुळे संदीप नाईक हे अपक्ष निवडणूक लढवणार की इतर पक्षात प्रवेश करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाप्रमुख रवींद्र माने हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळावा. या ठिकाणी शिवसेनेची मोठ्या प्रमाणात ताकद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मतदारसंघाला भरभरून निधी दिला आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. त्यामुळे रविंद्र माने यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा ठाम निर्णय केला आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिंदे सेना बंडखोरी करणार आहेत. अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवार यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत बंडाची पहिली ठिणगी पडली आहे. अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप आणि शिंदे सेना आमने सामने येणार आहेत. जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगरी विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रतिभा पाचपुते यांना धक्का बसला आहे. भाजपच्या सुवर्णा पाचपुते या अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे या महाविकासआघाडीत प्रवेश घेणार असल्याचे बोललं जात आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.
मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे, पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सोबतच सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे. सोलापूर शहर मध्यच्या जागेवर भाजपने कुरघोडी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिला आहे. सोलापुरातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुख तसेच संपर्क प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात तयारी करण्याचे आदेश दिल्याचा दावा मनीष काळजे यांनी केला आहे.
भाजपची पहिली यादी जाहीर होताच आता पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रशेखर कदमांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पूत्र सत्यजित कदम हे देखील राहुरी मतदारसंघांसाठी इच्छुक होते. मात्र ऐनवेळेला तिकीट कापल्याने ते नाराज झाले आहेत.