Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा धुराळा सुरु झाला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला ओपन चॅलेंज दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. आता कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची प्रचारसभा पार पडली. यापूर्वी विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण केले. कार्यालयाच्या उद्घाटनाला इतके लोक असतील तर प्रचाराला किती असतील, याचा तुम्ही विचार करा. समोरच्याचे डिपॉझिट नक्कीच जप्त होणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘लाडकी बहीण’ योजनांचा उल्लेख करत विरोधकांवर ताशेरे ओढले. “लाडक्या बहिणी इथे आहेत, आता त्यांना भाऊबीज दरवर्षी नाही तर दर महिन्याला मिळणार आहे. विरोधक सतत लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या पाठी लागले आहेत. विरोधी पक्षांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्नही केला आहे. ते सतत मला जेलमध्ये टाकायच्या पाठीमागे लागले आहेत. या लाडक्या बहिणींसाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“जर तुमच्याकडे कोणी मत मागायला आलं तर त्यांना जाब विचारा की लाडकी बहीण योजनेला विरोध का केला? ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात का गेलात? हे सर्वसामान्यांचे सरकार आहे त्यामुळे कोणाचाही मायका लाल आला तरी… सावत्र भाऊ, दृष्ट भाऊ किंवा विरोधक आले तर त्यांना जागा दाखवा”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
“विश्वनाथ भोईरला मत म्हणजे तुमच्या या भावाला मत आहे. आता दिवाळीचे फटाके फुटतात, तसा आपल्याला 23 तारखेला बॉम्ब फोडायचा आहे. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. अडीच वर्षात महाविकासआघाडीने काय केलं आणि आम्ही काय केलं याचा हिशोब होऊन जाऊ दे, आम्ही विकासकामांचा हिशोब द्यायला तयार आहोत, तुम्ही देणार का? असे ओपन चॅलेंज एकनाथ शिंदेंनी दिले. तुमच्या खुर्ची खाली फटाके नक्कीच फुटणार हे लक्षात ठेवा”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.