सासरा की सून, मुंबईतील ‘त्या’ जागेसाठी ठाकरेकडून कोणाला उमेदवारी? नाव आले समोर

| Updated on: Oct 27, 2024 | 11:54 AM

गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर महाविकासआघाडीतून ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडली असून ठाकरेंकडून लगेच या जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आला आहे.

सासरा की सून, मुंबईतील त्या जागेसाठी ठाकरेकडून कोणाला उमेदवारी? नाव आले समोर
Follow us on

Dahisar Assembly constituency MVA Candidate : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबद्दल चर्चा रंगली होती. अखेर महाविकासआघाडीतून ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडली असून ठाकरेंकडून लगेच या जागेसाठी उमेदवार घोषित करण्यात आला आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोसाळकर कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपसमोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून दहिसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार विनोद घोसाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. सामना या वृत्तपत्रातून त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दहिसर विधानसभा कोण लढणार हा महाविकासआघाडीतील तिढा अखेर सुटल्याचे पाहायला मिळत आहे.

दहिसर विधानसभा मतदारसंघातून विनोद घोसाळकरांच्या नावाची घोषणा

गेल्या काही दिवसांपासून दहिसर विधानसभा मतदारसंघातून घोसाळकर कुटुंबात सासरा आणि सून हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर या दोघांनीही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे याबद्दलची इच्छा व्यक्त केली होती. यानुसार उद्धव ठाकरेंकडून घोसाळकर कुटुंबाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला होता. त्यावेळी त्यांना दोघांपैकी कोण लढणार, यावर तुम्ही निर्णय घ्या, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. यानंतर तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची ट्वीटरवरुन घोषणा करण्यात आली होती. पण यानंतर तासाभराने दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर ऐवजी विनोद घोसाळकर निवडणूक लढतील असे जाहीर करण्यात आले.

तसेच सामना वृत्तपत्रातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुंबईतील चार जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार दहिसरमधून विनोद घोसाळकर, विलेपार्लेतून माजी नगरसेवक संदीप नाईक, वर्सोव्यातून हरुन खान आणि घाटकोपर पश्चिमेतून संजय भालेराव यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

घोसाळकर कुटुंबाचा अल्पपरिचय

दरम्यान विनोद घोसाळकर २००९ साली या मतदारसंघाचे आमदार होते. यानंतर २०१४ मध्ये त्यांना भाजपाच्या मनीषा चौधरींकडून पराभव स्वीकारावा लागलात. सध्या ते ठाकरे गटाचे उपनेते आणि संभाजीनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर याची ८ फेब्रुवारी २०२४ रोजी फेसबूक लाईव्ह करुन हत्या करण्यात आली होती. या हत्येत मॉरिस नोरान्हा उर्फ मॉरिसभाईने यांचं नाव समोर आलं होतं. जनतेत मिसळणारं जोडपं म्हणून घोसाळकर पती-पत्नीची ओळख होती. तर, अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत.