Devendra Fadnavis Security Increase : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षिततेत अचानक वाढ करण्यात आली आहे. गुप्तहेर संस्थेने दिलेल्या एका सूचनेनंतर देवेंद्र फडणवीसांच्या संस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या बंगल्यावर विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. एसआयडीने दिलेल्या गोपनीय रिपोर्टमुळे देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अलर्टवर आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जीवाला धोका असल्याने त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाच्या बारा जवानांची अतिरिक्त टीम तैनात करण्यात आली आहे. फोर्स वन या विशेष पोलिसांच्या पथकाकडे शस्त्र असून ते शस्रधारी जवान आता सध्या फडणवीसांची सुरक्षा सांभाळत आहेत. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर फोर्स वन या पोलिसांच्या विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र गुप्तहेर संस्थांना मिळालेल्या सूचनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आली आहे. त्या अंतर्गत फोर्स वनचे जवान त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसेच अनेक वरिष्ठ नेत्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता.