Ajit Pawar Devendra Fadnavis Future CM : विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुती अजित पवार गटात मुख्यमंत्रिपदावरुन सातत्याने चढाओढ पाहायला मिळत आहेत. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहेत. त्यातच आता राज्यात काही ठिकाणी अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकताना दिसत आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन चुरस रंगलेली असताना आता अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावण्यात आले आहेत. बारामतीतील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपाबाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे. बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात हा बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे. गुलाबी रंगाच्या या बॅनरवर अजित पवारांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यासोबच माणूस जीवाभावाचा, कट्टर दादाप्रेमी, तुमच्यासाठी कायपण, एकच वादा अजितदादा अशा आशयाचेही बॅनर यावेळी पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे नांदेडमधील एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह अनेक भाजप नेत्यांचे फोटो झळकत आहेत. त्यावर सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता, भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे सध्या या बॅनरची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
याआधीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे उल्लेख असलेले बॅनर लावले होते. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच राज्यात झळकणाऱ्या भावी मुख्यमंत्री या बॅनरमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवारांकडून मुख्यमंत्रिपदाची मागणी
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. अजित पवारांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला होता. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले होते.
अमित शाह हे पुन्हा दिल्लीकडे होण्यासाठी रवाना होत असताना अजित पवार आणि अमित शाहा यांची मुंबई विमानतळावर बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली. “महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे. राज्यात बिहार पॅटर्न राबवावा”, असा प्रस्ताव अजित पवारांनी अमित शाह यांच्यापुढे ठेवला. आता यावर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.