Narhari Zirwal on Sharad Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वीच नरहरी झिरवाळ यांनी शरद पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात अर्ज भरण्यापूर्वी नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिंडोरी विधानसभेसह राष्ट्रवादी शरद पवार गटाबद्दलही भाष्य केले. “राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार आहे. धनराज महाले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी धनराज महाले यांना विनंती करणार आहे आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असा मला विश्वास आहे”, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले.
“मला दिंडोरीतील मतदार विकासाच्या मुद्द्यावर निवडून देतील. मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 100 टक्के निवडून येणार याची मला खात्री आहे”, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
नरहरी झिरवाळ दिंडोरीतून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी धनराज महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकासाआघाडीत दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे धनराज महाले हे सध्या शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सध्या त्यांना शरद पवारांनी वेट अँड वॉचचा सल्ला दिला आहे. पण त्यातच नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.