Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र अद्याप अनेक जागांवर दोन्ही बाजूचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महायुती आणि महाविकासआघाडीत जागावाटपातील तिढा कायम असल्याचे दिसत आहेत.
महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाविकासाघाडीतील घटक पक्षांकडून आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकासाआघाडीकडून २८८ पैकी २५९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ९९, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ८४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ७६ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाविकासआघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये कोकण आणि मुंबईत मिळून सर्वाधिक ४० उमेदवार आहेत. मराठवाड्यात १३ आणि उत्तर महाराष्ट्रात ११ उमेदवार आहेत. विदर्भात ९ आणि पश्चिम महाराष्ट्रात ७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली. महाविकासआघाडीकडून अद्याप २९ जागांवर एकमत झालेलं नाही.
तर दुसरीकडे महायुतीकडून २३५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १२१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून ६५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून ४९ उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. महायुतीत अद्याप ५३ जागांवर एकमत झालेलं नाही.
महायुतीत वर्सोवा, मीरा भाईंदर, वसई, आष्टी, कराड उत्तर, मोर्शी-वारुद, शिवडी, कलिना, अणुशक्तिनगर, धारावी, करमाला, बार्शी, नांदेड़, अमरावती, अकोला-बालापुर कन्नड, सिंदखेड़ आणि बदलापूर यांसारख्या जागांवरील तिढा कायम आहे.
तर महाविकासआघाडीत सिंदखेडा, शिरपूर, अकोला पश्चिम, दरियापूर, वरूड-मोर्शी, पुसाद, पैठण, बोरिवली, मुलुंड, मलबार हिल, कोलाबा, खेड़ आळंदी, दौंड, मावल, कोथरुड, औसा, उमरगा, माढा, वाई, माण, सातारा, मिराज, खानापुर यांसारख्या जागांवरील पेच कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.