मनसेचं ठरलं… एकनाथ शिंदे विरोधात बडा चेहरा मैदानात उतरवणार; शिंदे गटाला ती गोष्ट भोवली?

| Updated on: Oct 23, 2024 | 5:02 PM

महाराष्ट्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकांसाठी मनसेने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात अमित ठाकरे यांचासह अनेकांचा समावेश आहे. मनसेने एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्यासाठी अभिजीत पानसे यांचे नाव पुढे केले आहे.

मनसेचं ठरलं... एकनाथ शिंदे विरोधात बडा चेहरा मैदानात उतरवणार; शिंदे गटाला ती गोष्ट भोवली?
Follow us on

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या निकालाची घोषणा केली जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी घोषित केल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दुसरी उमेदवार यादी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवार यादीत 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात अमित ठाकरे, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, राजू पाटील यांसह अनेकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

त्यातच आता मनसेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक मोठा चेहरा उतरवण्याची तयारी सुरु झाली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देण्याबद्दल मोठे वक्तव्य केले. तसेच यावेळी अविनाश जाधव यांनी उमेदवाराचे नावही सांगितले.

“माझ्यापुढे भाजपचा कोणताही आवाज चालणार नाही”

“मला मनसेकडून उमेदवारी मिळाली, याचा मला आनंद आहे. राज ठाकरे यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. गेल्यावेळी 75 हजार मते मिळाली होती. फक्त 15 हजाराने आमचा पराभव झाला होता. पण तो आता भरुन काढू. या सुसंस्कृत ठाण्यात मला 75 हजार मतं मिळाली होती. याचाच अर्थ ठाणेकरांनी खळखट्याक पॅटर्न स्वीकारला होता. माझ्यापुढे भाजपचा कोणताही आवाज चालणार नाही. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी कुठलीही काम केलेली नाहीत. त्यामुळे यंदा त्यांना जनतेने नाकारलेलं दिसत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या ठाण्यामध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. पण आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की उद्या राजसाहेब ठाकरेही उद्या ठाण्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यावेळी कुठे जास्त गर्दी असेल हे तुम्ही पाहालचं”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार का?

यावेळी अविनाश जाधव यांना एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अविनाश जाधव म्हणाले, “नक्कीच एकनाथ शिंदेंविरोधात मनसे उमेदवार देणार, कारण त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. मग आमच्याकडे त्यांच्या विरोधात अभिजीत पानसे योग्य उमेदवार आहेत. याबद्दल पक्षाचे नेते राज ठाकरे हे योग्य तो विचार करतील. अभिजीत पानसे हे एकनाथ शिंदे यांना तगडं आव्हान देतील”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.

“अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य आता राजकारणामध्ये सक्रिय होतोय. त्यामुळे त्याचा आनंद आहे”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.