अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर, 7 जणांची नावे जाहीर, त्यापूर्वी केली मोठी खेळी

| Updated on: Oct 25, 2024 | 10:13 AM

आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी अजित पवार गटात दिग्गजांचे पक्षप्रवेश पार पडले.

अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर, 7 जणांची नावे जाहीर, त्यापूर्वी केली मोठी खेळी
अजित पवार
Follow us on

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही दिवसांपूर्वी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली होती. या यादीत 38 उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. त्यानंतर आज सकाळीच अजित पवार गटाकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून ४५ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. त्यापूर्वी अजित पवार गटाकडून मोठी खेळीही करण्यात आली आहे.

अजित पवार गटाची दुसरी यादी

    • इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
    • तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
    • अणुशक्तीनगर – सना मलिक
    • वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
    • वडगाव शेरी – सुनील टिंगरे
    • शिरुर- ज्ञानेश्वर कटके
    • लोहा – प्रताप चिखलीकर

झिशान सिद्दीकींचा अजित पवार गटात प्रवेश

अजित पवार गटाने दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वी मोठी खेळी केली आहे. आज सकाळीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार गटात अनेक दिग्गजांनी प्रवेश घेतला. काँग्रेस नेते आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. आज अखेर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश घेताच त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. तसेच वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

संजय काका पाटील, निशिकांत भोसले यांना उमेदवारी जाहीर

त्यासोबतच भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर संजय काका पाटील यांना तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित करण्यात आली. तर निशिकांत भोसले पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

तसेच भाजप नेते आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांना अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा दिला होता. पण यंदा विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. ते वरुड मुर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.