“…तर उद्धव ठाकरे नकाशावर शोधूनही सापडले नसते”, निलेश राणेंचा घणाघात

| Updated on: Nov 08, 2024 | 9:23 AM

निलेश राणेंना शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या सभेत घराणेशाहीवरुन राणे कुटुंबियांवर आरोप केले, याबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी भाष्य केले.

...तर उद्धव ठाकरे नकाशावर शोधूनही सापडले नसते, निलेश राणेंचा घणाघात
निलेश राणे उद्धव ठाकरे
Follow us on

Nilesh Rane Criticizes Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. जर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे नसतं, तर उद्धव ठाकरे कोण हे नकाशावर शोधून सुद्धा सापडले नसते”, असा घणाघात मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी केला. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

निलेश राणे यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मालवण कुडाळ विधानसभेतील कामासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी निलेश राणेंना शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या सभेत घराणेशाहीवरुन राणे कुटुंबियांवर आरोप केले, याबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी भाष्य केले.

“घराणेशाहीवर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये”

“मला उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीही शिल्लक नाही. उद्धव ठाकरे हे घराणेशाहीवर बोलतात यापेक्षा मोठा विनोद नाही. पण त्यांना विनोद करण्याची सवय आहे. घराणेशाहीवर उद्धव ठाकरे यांनी बोलू नये, कारण एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवतो असं सांगून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. जर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे नसतं, तर उद्धव ठाकरे कोण हे नकाशावर शोधून सुद्धा सापडले नसते”, अशा शब्दात निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे सुद्धा वाचा

“उद्धव ठाकरेंची भाषणही रटाळ झाली आहेत”

“आम्ही कतृत्वावर आमच्या कामावर मत मागतो. मी हल्ली त्यांच्याकडे लक्षही देत नाही. महाराष्ट्रही त्याकडे लक्ष देत नाही हे तुम्हाला येत्या निवडणुकीत दिसेल. उद्धव ठाकरे आम्हाला जितक्या शिव्या घालतील तर ते आमच्यासाठी चांगलंच आहे. ते आमच्याबद्दल चांगलं बोलणार नाहीत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाला काहीही दिलं नाही. महाराष्ट्राला दिलं नाही तर कोकणाला कुठून देणार. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे आम्ही लक्ष देत नाही. ते शिव्या घालण्यापलीकडे काहीही बोलत नाही. उद्धव ठाकरेंची भाषणही रटाळ झाली आहेत. मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही”, असे निलेश राणे म्हणाले.

वडीलांच्या पराभवाचा वचपा काढणार का?

यावेळी निलेश राणेंना नारायण राणेंच्या पराभवाचा वचपा काढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निलेश राणे म्हणाले, माझ्या वडिलांचा पराभव कारण नसताना झाला, हे कोणत्याही मुलाला आवडणार नाही. यात आमची काहीही चूक नव्हती. आमच्यातील काहींनी गद्दारी केली आणि आम्ही ओव्हरकॉन्फिन्ट झालो. गाफील होतो. त्याचा फायदा समोरच्याला झाला. मला लालदिव्याचे वेड नाही किंवा त्याचा मी पाठलाग करत नाही. पण या मतदारसंघाची जी काही अवस्था झाली आहे, ती सुधारायला हवी, असेही निलेश राणेंनी म्हटले.