आजपासून राज्यात मोदी पर्व, चार दिवस 9 सभा, एक रोड शो अन्…पंतप्रधानांच्या कुठे, कधी सभा? संपूर्ण वेळापत्रक पाहा

| Updated on: Nov 08, 2024 | 10:22 AM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना आजपासून सुरुवात होत आहे. धुळे आणि नाशिक येथील सभांनी या प्रचाराला सुरुवात होईल. मोदी चार दिवसांत नऊ सभा आणि एक रोड शो करणार आहेत. या सभांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

आजपासून राज्यात मोदी पर्व, चार दिवस 9 सभा, एक रोड शो अन्...पंतप्रधानांच्या कुठे, कधी सभा? संपूर्ण वेळापत्रक पाहा
PM Narendra Modi
Image Credit source: PTI
Follow us on

PM Narendra Modi Today Maharashtra Rally : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा धुळ्यात पार पडणार आहे. आज दुपारी 12 वाजता ते धुळ्यात जनतेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांसाठी चार दिवसांत नऊ प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. तसेच एक रोड शोदेखील मोदी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्याही सभा होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे संपूर्ण वेळापत्रक

भाजपने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा कार्यक्रम निश्चित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज दुपारी 12 वाजता धुळ्यात पार पडेल. त्यानंतर दुपारी दोन वाजता नाशिक येथील सभेला पंतप्रधान संबोधित करतील. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित असतील. यानंतर शनिवारी 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेड या ठिकाणी मोदींची सभा होईल. मंगळवारी, 12 नोव्हेंबर पुण्यात रोड शो आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी मोदी हे चिमूर आणि सोलापुरात सभा घेतील. यानंतर गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी संभाजीनगर, रायगड आणि मुंबईतील प्रचारसभांना नरेंद्र मोदी संबोधित करतील.

कोण-कोण राहणार उपस्थितीत?

आज धुळे शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या गोशाळेच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांसाठी ही सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा धुळ्यात होत असून यासाठी धुळे, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या ठिकाणचे नागरिक गर्दी करणार आहेत. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

मोठा बंदोबस्त तैनात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा धुळे शहरातील सभा 45 एकरावर पार पडत असून यासाठी अडीच हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी भव्य सभा मंडप आणि व्यासपीठ अशी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सभेला एक लाख लोक उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात महायुतीला आठ जागांपैकी केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. लोकसभेतील धक्का लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचा पहायला मिळत आहे.

भाजप कार्यकर्त्यांमध्येच नाराजीचा सूर

दरम्यान धुळ्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेत सुरक्षेचा अतिरेक पाहायला मिळत आहे. अनेक माध्यम प्रतिनिधींना देखील सभेला जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. तसेच काळ्या रंगाची पँट परिधान करणाऱ्यांनाही सभा स्थळापर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षेच्या अतिरेकामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.