Aaditya Thackeray Responsibility : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला २३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकासआघाडीचा विधानसभेत मोठा पराभव झाल्याने आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर महाविकासआघाडीला मोठा फटका बसला. महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या. तसेच अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे सध्या महाविकासआघाडीच्या गोटात मोठ्या हालचाली घडत आहेत.
सध्या सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांच्या बैठका आणि चर्चा सत्र सुरु आहेत. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थितीत होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ठाकरे गटाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली. यात आदित्य ठाकरेंना मोठी जबाबदारी देण्यात आली.
महाविकासाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील.