Sada Sarvankar Rally : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात उतरलेल्या सदा सरवणकर यांची प्रचारफेरी काल शिवसेना भवनासमोर आयोजित करण्यात आली होती. यावेळी घडलेल्या एक प्रकाराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. माहीममधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाने महेश सावंत यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही लढत सर्वात प्रतिष्ठेची मानली जात आहे. अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर या तिघांकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. काल सदा सरवणकर यांची प्रचारफेरी दादरमधील शिवसेना भवन कार्यालयाच्या समोर आयोजित करण्यात आली होती. या प्रचारफेरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे सहभागी झाले होते.
सदा सरवणकर यांची प्रचारफेरी शिवसेना भवन येथे आल्यानंतर श्रीकांत शिंदेंसह सरवणकरांवर फुलांची उधळण करण्यात आली. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी शिवसेना आणि महायुतीचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांना भरघोस मतदान करा, असे आवाहन श्रीकांत शिंदेंनी केले.
शिवसेना आणि महायुतीचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ आज दादर – प्रभादेवी – माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत आवर्जून सहभागी झालो. यावेळी नागरिकांनी दर्शविलेली उपस्थिती आणि रॅलीत होणार शिवसेनेचा जयघोष हा श्री. सदा सरवणकर यांच्या विजयाची शाश्वती देणारा होता.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांशी संवाद साधून श्री.सदा सरवणकर यांना विजयी करण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मतदान करा असे आवाहन यावेळी सर्वांना केले. याप्रसंगी सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला. यावेळी महायुतीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, असे ट्वीट श्रीकांत शिंदेंनी केले आहे.
शिवसेना आणि महायुतीचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ आज दादर – प्रभादेवी – माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत आवर्जून सहभागी झालो. यावेळी नागरिकांनी दर्शविलेली उपस्थिती आणि रॅलीत होणार शिवसेनेचा जयघोष हा श्री. सदा सरवणकर… pic.twitter.com/rUUKj7Uihf
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) November 7, 2024
दरम्यान मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 420 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडीने मुंबईतील 36 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे 22, काँग्रेस 11 आणि शरद पवार गट 2 तसेच एका जागेवर समाजवादी पार्टीने उमेदवार दिला आहे. तर महायुतीकडून भाजप 18, शिंदे गट 16 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत 25 उमेदवार दिले आहेत. यामुळे मराठी मतदारांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकासाआघाडी या दोघांचे आव्हान वाढले आहे.