…तेव्हा त्याने मैदानात उतरायला हवे होते, शर्मिला ठाकरे राज ठाकरेंबद्दल असं का म्हणाल्या?

| Updated on: Nov 13, 2024 | 8:37 AM

मनसेकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सातत्याने सभा सुरु आहेत.

...तेव्हा त्याने मैदानात उतरायला हवे होते, शर्मिला ठाकरे राज ठाकरेंबद्दल असं का म्हणाल्या?
Raj & Sharmila Thackeray
Follow us on

Sharmila Thackeray Thane Speech : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी, महायुती यांच्यासह मनसे पक्षानेही लक्ष वेधून घेतले आहे. मनसेकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी १३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सातत्याने सभा सुरु आहेत. आता नुकतंच ठाण्यातील एका सभेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन हल्लाबोल केला.

मनसेकडून ठाणे विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहे. अविनाश जाधव यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यातच काल ठाण्यातील गोकुळनगर भागात एक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलही भाष्य केले.

“बहि‍णींना १५०० रुपये देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या”

“लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या. आपल्या महिलांना 1500 रुपये भीक देण्याची गरज नाही”, अशा शब्दात शर्मिला ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. “स्वातंत्र्यापासून सर्व पक्ष सत्तेत आहेत. दादर माहीममध्ये कोळी वस्तीत वाईट अवस्था आहे. ते बेसिक सुविधा पुरवू शकत नाही. मी स्वत: 10 वेळा पाण्यात पडता पडता वाचले. कोळीवाड्यात गटार उघडी आहेत. आजही 25 वर्षे सत्तेत असणारी शिवसेना गटरांवर झाकण लावू शकत नाही. मुंबई गोवा महामार्ग झाला नाही. आपल्या आमदार खासदारांची भूक तरी किती? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केला. तसेच तुमचं पोट भरल्यावर तरी काम करा”, असा सल्ला शर्मिला ठाकरेंनी दिला.

शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. या काळात ते दोन वेळा मंत्रालयात गेले, असा उल्लेख केला आहे. “त्यावेळी राजा मैदानात उतरायला हवा होता, पण राजा बंगल्यावर होता”, असा हल्लाबोल शर्मिला ठाकरेंनी केला.

365 दिवस अविनाश जाधव तुमच्यासाठी उपलब्ध

“तुम्ही टीव्हीवर बघत असाल की शर्मिला वहिनी अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी माहीम आणि दादर परिसरात जातात. अमित ठाकरे त्यांचा मुलगा आहे, तसेच अविनाश जाधव यांच्यावर देखील त्या दुसऱ्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. मी फार काही बोलत नाही. त्यांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा महत्त्वाच्या आहेत. अविनाश जाधव हा 24 तास काम करतो. त्यामुळे अविनाश जाधव यांच्या पाठीशी उभे रहा, मी विश्वास देतो. तुमचं मत फुकट जाणार नाही. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा आणि 365 दिवस अविनाश जाधव तुमच्यासाठी उपलब्ध असेल”, असं मनसेचे नेते अभिजीत पानसेंनी म्हटले.