Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रचार सभांचा धडका पाहायला मिळणार आहे. त्यातच मुंबईतील अनेक ऐतिहासिक सभांचे साक्षीदार असलेल्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कला भलतेच डिमांड आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच अनेक पक्षांनी प्रचारसभांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये कुठे, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळेत प्रचार सभा घ्यायच्या याचे नियोजन नेत्यांकडून केले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा १८ नोव्हेंबर २०२४ रोजी थंडावतात. त्याआधी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी शेवटचा रविवार आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या सभा पाहायला मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दादरच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे शिवाजी पार्क मैदानासाठी चार पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाले आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानसाठी 4 पक्षात रस्सीखेंच सुरु झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजप आणि मनसे या चार पक्षांमध्ये शिवाजी पार्क मैदान प्रचारासाठी मिळावे यासाठी चुरस रंगली आहे. या चारही पक्षांकडून १७ नोव्हेंबरसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबरला प्रचार तोफा थंडावत असल्याने १७ नोव्हेंबरला मैदान मिळावं, यासाठी चढाओढ सुरु आहे. या मैदानासाठी सर्वात पहिल्यांदा अर्ज मनसेकडून आला आहे. त्यामुळे मनसेच्या सभेला परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
“येत्या १८ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. त्यामुळे १७ नोव्हेंबरला संध्याकाळी सभा घेण्यासाठी आम्ही शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज दिला आहे. १७ नोव्हेंबरला इतर तीन पक्षांनी देखील महापालिकेकडे अर्ज केला आहे. जेव्हा एकाच दिवसासाठी आणि एकाच ठिकाणासाठी अनेक पक्ष अर्ज देतात, तेव्हा प्रथम अर्ज देणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. त्यामुळे हे मैदान सभेसाठी आम्हालाच मिळणार”, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
“शिवाजी पार्क मैदान हे मुंबईचे मध्यवर्ती मैदान असून याला ऐतिहासिक वारसा आहे. या मैदानाचा राजकीय वारसा बाळासाहेबांमुळे तयार झाला आहे, तो मान्य करावा लागेल. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडतो. त्यामुळे सर्वच पक्षांना असं वाटतं की आपली सभा शिवाजी पार्क मैदानात झाली पाहिजे”, असेही यशवंत किल्लेदार यांनी म्हटले.