Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकासआघाडीमध्ये लढत होणार आहे. राज्यात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहे. त्यातच आता अजित पवार पुन्हा स्वगृही परतणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. आता यावर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी खिंडार पाडत भाजपसोबत युती केली. यावेळी त्यांनी 40 आमदारांना सोबत घेत मोठी खेळी केली होती. यानंतर अजित पवार हे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार निवडणुकीनंतर पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पीटीआयला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले.
“शरद पवार आणि अजित पवार हे राजकीयदृष्ट्या पुन्हा एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत अशाप्रकार एकत्र येणं सोपं होणार नाही. कारण राजकीयदृष्ट्या आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत”, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
“लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने ठामपणे मतदान केले. लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकासआघाडीने ३० जागा जिंकल्या. आताही राज्यातील मतदारांच्या मनात स्पष्टता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसारखीच कामगिरी महाविकासआघाडी विधानसभा निवडणुकीतही करेल”, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
“आमचा पक्ष काँग्रेससोबत आहे आणि ते (अजित पवार) भाजपसोबत आहेत. ही एक वैचारिक लढाई आहे. नेत्यांना जनतेत आपल्या भावना दर्शवण्याची परवानगी नाही. जर नेता तुटला तर घरातील लोक कसे जगतील. नेता होणे हे एकटेपणाचे काम आहे. आपण आपल्या वागण्यात सहानुभूतीशील आणि दयाळू असले पाहिजे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.