Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. महायुती आणि महाविकासआघाडीत अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीनंतर अनेक मतदारसंघांत पक्षांतर्गत नाराजी समोर आली. यामुळे काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे राज्यात बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वाशिम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बंड झाले आहे. यात रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अमित झनक यांना काट्याची लढत देणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. भाजपकडून रिसोडमध्ये उमेदवारी मिळेल या आशेवर अनंतराव देशमुखांनी पुत्रांसह पक्षप्रवेश केला होता. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्याने येथून भावना गवळी यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे अनंतराव देशमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सध्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसचे अमित झनक, महायुतीच्या शिंदे गटाकडून भावना गवळी, तर वंचितकडून प्रशांत गोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपकडून इच्छुक असलेल्या अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कारंजा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 50 उमेदवारांनी 61 अर्ज दाखल केले आहेत. कारंजा विधानसभा मतदारसंघातून महाविकासआघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. ज्ञायक पाटणी यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. तर महायुतीकडून भाजपच्या सई डहाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एमआयएमने या मतदारसंघातून युसुफ पुंजानी यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे. कारंजामध्ये ऐनवेळी वंचितने उमेदवार बदलून काँग्रेसचे सुनील धाबेकर यांना संधी दिली. तर समनक जनता पार्टीकडून ययाती नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कारंजा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून देवानंद पवार हे इच्छुक उमेदवार होते. मात्र ही जागा शरद पवार गटाला गेल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज जाहीर करण्यापूर्वी बंडखोरांना थंड केले जाणार का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाशिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट करून महायुतीकडून श्याम खोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाकडून डॉ. सिद्धार्थ देवळे हे मैदानात उतरले आहेत. तर वंचितकडून मेघा डोगरे यांना उमेदवारी दिली गेली आहे. वाशिम मतदारसंघातून उमेदवारी नाकारली गेल्याने भाजपतील अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ठाकरे गटाकडूनही अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते शशिकांत पेंढारकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबतच ठाकरे गटाच्या मदन उर्फ राजा भैया पवार यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे.