नागपूर : “एसपी म्हणजे सरकार. अधिकारी आदेश देतो, म्हणजे जबाबदारी सरकारची असते. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, त्याचा मला आनंद असून उपयोग नाही. पण मराठा समाजाला काय वाटतं, ते महत्त्वाच आहे. हे पुरस्कृत होतं, हे सिद्ध झालं” असं राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. “मनोज जरांगे पाटील मागच्या 12-13 दिवसापासून आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. एक माणूस समाजासाठी लढतोय, त्याची काळजी घेणं ही शासन, सर्वांची जबाबदारी आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले. “यावर तोडगा काय काढायचा? तो फॉर्म्युला आम्ही सांगितलाय. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, अधिकच वाढवून द्या. राज्यात आणि केंद्रात बहुमतातल सरकार आहे. एका झटक्यात काम होऊ शकतं. ही फिरवाफिरवी कशाला? तुम्हाला महिना कशाला पाहिजे?” असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.
“आरक्षण एक वेगळा विषय आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या मूळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. भले, माझा जीव गेला तरी चालेल. गैरसमज पसरवू नका. मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याच काम करु नये. सरकार एक भूमिका मांडत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वेगळं बोलतात. हा काय चाललय?. लोकांना फसवण्याच काम चालू आहे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करता का? दोन समाजात भांडण लावायची काम करता का? मराठा समाज काय समजायच ते समजेल” असं वडेट्टीवार म्हणाले. “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच नुकसान होऊ नये, म्हणून माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे” असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. माझ्या शब्दात कुठलीही फिरवाफिरवी नाही, असं त्यांनी सांगितलं.
’30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी शक्य नाही’
“मराठा समाजाला कुणबी समाजाच प्रमाणपत्र देणार असाल, तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार का? हा प्रश्न विचारला जाणार. ओबीसीतून आरक्षण देणार असाल, तर ते वाढवून द्या” अशी आमची भूमिका आहे असं वडेट्टीवार म्हणाले. एकदिवसात आरक्षण शक्य नाही, 30 दिवस लागणार असं सरकारडून सांगितल जातय. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “30 दिवस नाही, 30 महिने घेतले तरी शक्य नाही. ही शुद्ध धूळफेक आहे. लाठीचार्ज मुळे जो असंतोष निर्माण झालाय, तो शातं करण्यासाठी हे सर्व सुरु आहे”