अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान; अधिवेशनात काय घडणार?

| Updated on: Dec 12, 2024 | 2:56 PM

आता शिवसेना ठाकरे गटाने विरोध पक्षनेतेपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पॅटर्ननुसार विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. आता यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठे विधान केले आहे.

अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाबाबत विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान; अधिवेशनात काय घडणार?
राहुल नार्वेकर
Follow us on

Rahul Narwekar on Maharashtra opposition Leader : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी कोण असणार याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. महाविकासाआघाडीकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी करण्यात आली आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदावरुन एक महत्त्वाचे विधान महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र विरोधी पक्षांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता असणार का, असा प्रश्न सतत उपस्थित होत असतो. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाने विरोध पक्षनेतेपदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पॅटर्ननुसार विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. आता यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठे विधान केले आहे.

विरोधी पक्षनेतेपद नियमानुसार दिले जाईल

“महाविकासआघाडीतील कोणत्या पक्षांकडून अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्ताव आलेला नाही. पण प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतर अध्यक्ष म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. विरोधी पक्षनेतेपद नियमानुसार दिले जाईल. त्याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल”, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

अध्यक्ष म्हणून न्यायबुद्धीने वागणूक देईन

“विरोधी पक्षनेतेपदासाठी आवाज दाबण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही. तर तसा प्रयत्न असता संख्याबळ नसतानाही विरोधकांना कामकाज सल्लागार समितीत स्थान देण्यात आलं नसतं. संख्या नसली तरी विरोधकांचा आवाज ऐकला जाईल. संसदीय लोकशाहीला कुठेही गालबोट लागणार नाही. विरोधकांना भूमिका मांडायला योग्य संधी दिली जाईल. अध्यक्ष म्हणून न्यायबुद्धीने मी वागणूक देईन”, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

“ईव्हीएम आणि विधीमंडळाचा संबंध नाही”

“ईव्हीएम आणि विधीमंडळाचा संबंध नाही. विधीमंडळात जनतेच्या प्रश्नांची चर्चा होते. सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली की नाही, हे पाहणं माझं कर्तव्य आहे,” असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

“वैयक्तिक संबंधांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा”

यावेळी राहुल नार्वेकरांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते 50 वर्ष ते लोकसेवेत आहेत. मी त्यांचे अभिष्ट चिंतन करतो. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.