Maharashtra Marathi Breaking News Live : आम्ही अदानीला घाबरत नाही, भविष्यामध्ये विरोध करत संघर्ष करू, वर्षा गायकवाड यांची रोखठोक भूमिका

| Updated on: Dec 21, 2023 | 7:31 AM

Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE Updates : आज 20 डिसेंबर... राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनासंदर्भातील प्रत्येक घडामोडी... तसंच संसदेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातील महत्वाच्या बातम्या तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यासांठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi Breaking News Live : आम्ही अदानीला घाबरत नाही, भविष्यामध्ये विरोध करत संघर्ष करू, वर्षा गायकवाड यांची रोखठोक भूमिका
Follow us on

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज अधिवेशनात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल. तसंच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याच बरोबर राजधानी दिल्लीतही संसदेचं हिवाळी अधिवेशन पार पडतं आहे. या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक मुद्दा गाजला तो खासदारांच्या निलंबनाचा… कालपर्यंत 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. हा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यामुळे आज संसदेत काय होतं हे पाहावं लागेल. आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींसाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Dec 2023 06:00 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांकडून अदाणीला आनंद देण्याचे काम सुरू, आमदार वर्षा गायकवाड

    मुंबई | धारावीच्या पुनर्विकासावरुन आमदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून अदाणीला आनंद देण्याचे काम सुरू, असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसेच काहीही झालं तरी आम्ही लढत राहू, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.

    वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

    – धारावी पुनर्विकास बाबत मी त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे. मला असं वाटतंय की मुख्यमंत्री जे बोलले ते साफ चुकीचे बोललेले आहेत. याचे पडसाद भविष्यामध्ये उमटताना पाहायला मिळतील. आम्ही काय अडाणीला घाबरत नाही.

    – यापूर्वी देखील त्यांनी निधी दिला होता दहा कोटींचा निधी दिला मग त्यावर स्टे दिला.

    – कोर्टात जाऊन आम्ही तो निधी घेतला. त्यामुळे त्रास देण्याचे काम ते करत आहेत.

    – आम्ही 1 हजार कोटींची इंडस्ट्री धारावीत ऊभारली.

    – धारावीत नगरसेवक फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच अदाणीला आनंद देण्याचे काम मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे.

    -आम्ही अडानीला घाबरत नाही भविष्यामध्ये अडानीला विरोध करत आम्ही संघर्ष करू.

    – रस्त्यावर उतरू पण आम्ही त्या ठिकाणी धारावीचा पुनर्विकास होऊ देणार नाही आमची ठाम भूमिका आहे.

  • 20 Dec 2023 05:29 PM (IST)

    विद्यार्थ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा सरकारवर आरोप

    नागपूर | अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या पीएचडी धारक संशोधकांना अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा मुद्दा आमदार वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला. शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने या विद्यार्थ्यांची अत्यंत गैरसोय होत असून सरकार या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


  • 20 Dec 2023 05:25 PM (IST)

    पुरस्कार 12 मार्चला प्रदान करण्यात येणार

    कोल्हापूर | साहित्य विश्वातून मोठी बातमी आली आहे. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला जाहीर करण्यात आला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात मराठीतून कृष्णात खोत यांनी बाजी मारली आहे. प्रतिष्ठेचा आणि मानाचा असलेला हा पुरस्कार 12 मार्चला प्रदान करण्यात येणार. कृष्णात खोत यांना विविध अतिथींच्या उपस्थितीत स्नानित करण्यात येणार आहे. ‘रिंगण’ या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्र उलगडण्यात आलं आहे.

  • 20 Dec 2023 05:20 PM (IST)

    राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपतींचा अपमानच्या निषेधार्थ गुरुवारी तीव्र आंदोलन

    हिंगोली | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यभरात भाजपकडून गुरुवारी 21 डिसेंबर रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपनुसार, राहुल गांधी यांनी उपराष्ट्रपती यांचा अपमान केला. त्या निषेधार्थ राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली.

  • 20 Dec 2023 04:55 PM (IST)

    पाच वर्षांत 324 प्रकरणे एनआयएकडे सोपवली : नित्यानंद राय

    केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2018 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत 324 प्रकरणे राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवली आहेत.

  • 20 Dec 2023 04:45 PM (IST)

    आणखी 2 लोकसभा खासदार निलंबित

    बुधवारी आणखी दोन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. सी थॉमस आणि एम आरिफ यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 143 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

  • 20 Dec 2023 04:35 PM (IST)

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यांना बजावला समन्स

    मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना समन्स बजावले आहेत. ईडीने लालू यादव यांना 27 डिसेंबरला तर तेजस्वी यादव यांना 22 डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.

  • 20 Dec 2023 04:24 PM (IST)

    धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका

    धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नाव न घेता टीका केली आहे. धारावी पुनर्विकासाची निविदा का रद्द केली असा आरोपही त्यांनी केला. विशेष लोकांना काम देण्यासाठीच टेंडर रद्द केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

  • 20 Dec 2023 04:22 PM (IST)

    रेमडिसिवीरच्या कंत्राटात मोठा गैरव्यवहार- एकनाथ शिंदे

    रेमडिसिवीरच्या कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. जनतेला लुबाडलं आणि स्वत:ची घरं भरली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

  • 20 Dec 2023 04:18 PM (IST)

    कोरोना काळात लोकं मरत होते, हे पैसे खात होते- मुख्यमंत्री

    कोरोना काळात लोकं मरत होते तेव्हा हे लोक पैसे खात होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी असताना लोकं जगण्यासाठी धडपडत होती, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. घरी बसून महाराष्ट्र 1 नंबर कसा होणार असा प्रश्नही त्यांनी केला.

  • 20 Dec 2023 04:04 PM (IST)

    जिजामाता उद्यान येथील पेंग्विनपासून भ्रष्टाचार सुरु झाला, मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप

    नागपूर : कोविड काळात जो भ्रष्टाचार झाला. त्या प्रकरणातील एक महत्वाचे प्यादे हे याची सुरवात जिजामाता उद्यान येथील पेंग्विनपासून सुरु झाली. येथून रोम हर्षक प्रवास सुरु झाला. २७० कोटी रुपयांची 57 कंत्राट देण्यात आली. त्याच कंपनीला ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे काम दिले. रस्ता बांधणारा कंत्राटदार त्याला हे काम देण्यात आले. त्याचे त्या आधी बोरिवलीत दुकान होते. यामागचा सूत्रधार कोण? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

  • 20 Dec 2023 03:59 PM (IST)

    कोविड काळात भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईटलाही मागे टाकेल, मुख्यमंत्री शिंदे यांचा आरोप

    नागपूर : राज्यात यापुढे कुणालाही अनधिकृत बांधकाम होणार नाही. आणि त्याला कुणी समर्थन देईल त्याची गय केली जाणार नाही. मुंबईत कोविड काळात जो भ्रष्टाचार झाला. त्याची एकेक सुरस कथा आहेत. अरेबियन नाईट यालाही मागे टाकले अशा या कथा आहेत. त्याची चौकशी सुरु आहे. लवकरच त्यातील सत्य बाहेर येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 20 Dec 2023 03:51 PM (IST)

    माझ्या पोतडीत किती ठेवले आहे तुम्हाला माहित नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

    नागपूर : शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या त्या वेळी सरकार उभे राहिले. मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले. पायऱ्यांवर, रस्त्यावर किती बोलता. पण, मी संयम ठेवला आहे. माझ्या पोतडीत किती ठेवले आहे हे तुम्हाला माहित नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. अशोकपर्व चांगले होते पण पुढे त्याचे काय झाले असा टोलाही त्यांनी लगावला.

  • 20 Dec 2023 03:45 PM (IST)

    विरोधी पक्षाचे गलबत भरकटले, मुख्यमंत्री यांची विरोधकांवर टीका

    नागपूर : विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अवसान गळाले आहे. दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचे गलबत भरकटले आहे. काय मागणी करायची हे ही त्यांना कळले नाही. जलयुक्त शिवार योजनेत घोटाळा केल्याचा आरोप केला. तो योजना बंद झाली आणि आता तीच योजना सुरु करण्याची मागणी करत आहेत. म्हणजे नेमक चुकतय कोण? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

  • 20 Dec 2023 03:40 PM (IST)

    महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास तत्वतः मान्यता, मंत्री अतुल सावे यांची माहिती

    नागपूर : राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याअनुषंगाने १५ जानेवारीपूर्वी याबाबत निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असे इतर मागास, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले.

  • 20 Dec 2023 03:35 PM (IST)

    कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

    नाशिक : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात ३०० आणि डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात १०० असे एकूण ४०० बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. आवश्यकता वाटल्यास रुग्णाची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

  • 20 Dec 2023 03:31 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील झाले शेतकरी नेते? कृषी प्रदर्शनाचे केले उद्घाटन

    बीड : मराठा आरक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले मनोज जरांगे पाटील हे शेतकरी नेते म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. बीडमधील गेवराई येथे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. हे आंदोलन संपले तर शेतकऱ्यांच्या विषयावर काम करू. त्यासाठी आसूड उचलला आहे असे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

  • 20 Dec 2023 03:27 PM (IST)

    सलीम कुत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पाचव्यांदा चौकशी

    नाशिक : ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होत आहे. आज पाचव्यांदा सुधाकर बडगुजर यांची चौकशी होत आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात ही चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे चौकशी करत आहेत. १९९३ मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे.

  • 20 Dec 2023 03:24 PM (IST)

    मोठी बातमी : लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांना ईडीकडून समन्स

    बिहार : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याबाबत मनी लॉन्ड्रीग केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. 22 डिसेंबरला तेजस्वी यादव यांनी तर 27 डिसेंबरला लालूप्रसाद यादव यांनी ईडी कार्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.

  • 20 Dec 2023 03:20 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांचे निलंबन, पुण्यात झळकले मोदी यांच्या निषेधाचे बॅनर

    पुणे : सुप्रिया सुळे यांच्या निलंबनाविरोधात पुण्यात बॅनर झळकावण्यात आलेत. यात मोदी यांचा हिटलर असा उल्लेख करण्यात आलाय. हिटलररुपी मोदीचा निषेध असो अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हिटलरचा मोदींच्या रुपी पुनर्जन्म असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 20 Dec 2023 03:08 PM (IST)

    कंत्राटी कामगारांना संरक्षण देणारे विधेयक आणणार, कामगार मंत्री सुरेश खाडे

    नागपूर : कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील. कंत्राटी कामगारांना नियमित कामगारांप्रमाणेच सक्षम कारणाशिवाय कामावरून कमी करू नये. तसेच कामावरून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जावी आदी बाबींसंदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले.

  • 20 Dec 2023 03:05 PM (IST)

    अपमान कोणी केला? कसा केला? राहुल गांधी यांचा सवाल

    नवी दिल्ली : राज्यसभा सभापती यांची मिमिक्री प्रकरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपमान कोणी केला? कसा केला? असा सवाल केला. आमच्या दीडशे खासदारांना बाहेर फेकले गेले. त्याची चर्चा होत नाही. बेरोजगारी, अदानी या मुद्द्यावर चर्चा होत नाही. मी जो व्हिडिओ केला तो आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 20 Dec 2023 03:01 PM (IST)

    पोलिसांची मेगाभरती करणारे सरकार, फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर

    नागपूर : 1976 नंतर आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. यात पोलीस स्टेशनचे अंतर किती असावे. पोलिसांची संख्या किती असावी हे ठरविले जाणार आहे. राज्यात 23 हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

  • 20 Dec 2023 02:30 PM (IST)

    दिल्लीत बेरोजगारीच्या विरोधात युश काँग्रेसचे आंदोलन

    नवी दिल्ली : बेरोजगारीच्या विरोधात दिल्लीत युथ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. पोलिसांनी बॅरिकेटिंग करत आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

  • 20 Dec 2023 02:20 PM (IST)

    जरांगे पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन

    बीड : जरांगे पाटील यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आज राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी शेती संबंधित स्टॉलला भेट दिली. या कृषी प्रदर्शनाचे हे 16 वे वर्ष आहे.

  • 20 Dec 2023 02:06 PM (IST)

    कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरणा वरून रंगला श्रेयवाद

    कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरणा वरून  श्रेयवादाची लढाई सुरु आहे. लवकरच पुतळा अनावरणाचा भव्य दिव्य कार्यक्रम करणार असल्याचं शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे. चार दिवसापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुतळा अनावरण करण्यात आला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यक्षमतेवर देखील राजेश क्षीरसागर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दीपक केसरकर आणखी एक वर्ष पालकमंत्री असते तर कोल्हापूर जिल्ह्याचा कायापालट झाला असता असं देखील क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

  • 20 Dec 2023 01:58 PM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी

    पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेयर बनवण्याचा सुचना. राज्य मागासवर्ग आयोग बनवनार डेमो त्याच्या कामाला सुरुवात. सॉफ्टवेयर डेव्हलप करण्याच्या कामाला सुरुवात. शासन यंत्रणेद्वारे होणार समाजाचा सर्वेक्षण. त्यावर मात्र राज्य मागासवर्ग आयोगाच. आयोगाचं नियंत्रण असणार. सर्वेक्षण घरोघरी जाऊन सॉफ्टवेयर मध्ये महिती फीड केली जाणार

  • 20 Dec 2023 01:35 PM (IST)

    देवयानी फरांदे यांच्याबद्दल सुषमा अंधारे यांचे मोठे विधान

    आमदार देवयानी फरांदे यांची स्क्रिप्ट नक्की कोण लिहून देतो कळत नाही. ज्यांना माझ्याशी थेट भिडता येत नाही ते असे एकेकाला manipulate करून पुढे पाठवतात, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

  • 20 Dec 2023 01:17 PM (IST)

    कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारचे धोरण चुकीचं- अमोल कोल्हे 

    गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे. कांद्याच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारचे धोरण चुकीचं आहे. कांद्याचे भाव पाडण्यात आले. राज्यात सरकार फक्त फोटो काढण्याचं काम करत आहे. शेतकाऱ्यांचा प्रश्न केंद्रात कुणीच मांडत नाहीस असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

  • 20 Dec 2023 01:05 PM (IST)

    प्रविण दरेकर यांचे मोठे विधान

    या अधिवेशनात विरोधी पक्षाने काही केलं नाही विस्कळीत झालेल्या विरोधी पक्ष पाहायला मिळाला. सभागृहाचे कामकाज होऊन देण्यात येईल विरोधी पक्षाने वेळ घालवला अनेकदा कामकाजाचा तहकूब केलं, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

  • 20 Dec 2023 12:55 PM (IST)

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण – छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली. आज सत्र न्यायालयात यासंदर्भात होणार सुनावणी.

     

  • 20 Dec 2023 12:49 PM (IST)

    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केला अवैध दारूचा साठा जप्त

    मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध दारूचा साठा जप्त केला. वाडीबंदर येथे धाड टाकून  तब्बल दीड कोटी रुपयांची अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात या दारूची तस्करी करण्यात आली होती.  याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.

  • 20 Dec 2023 12:42 PM (IST)

    मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुन्हा करणार दिल्ली दौरा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. जागावाटप, मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर महत्वपूर्ण मुद्यांवर केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा होण्याची शक्यता.

  • 20 Dec 2023 12:35 PM (IST)

    विरोधी पक्षातील आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीच्या वेळेच्या प्रतीक्षेत

    विरोधी पक्षातील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीच्या वेळेच्या प्रतीक्षेत आहेत. विकासनिधी मिळत नसल्याने नाराजी पत्र लिहून दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र अद्यापही वेळ मिळालेली नाही.

  • 20 Dec 2023 12:20 PM (IST)

    हे सरकार टक्केवारीचं, भ्रष्टाचाराचं सरकार – अंबादास दानवे

    हे सरकार टक्केवारीचं, भ्रष्टाचाराचं सरकार असल्याची जोरदार टीका अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली.

  • 20 Dec 2023 12:12 PM (IST)

    उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री प्रकरणावरून भाजप खासदार आक्रमक

    उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री प्रकरणावरून भाजप खासदार आक्रमक झाले. राज्यसभेत भाजप खासदारांनी उभं राहून मौन राखत, याचा निषेध नोंदवला.

  • 20 Dec 2023 12:04 PM (IST)

    जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला ‘मार्ड’ संघटनेचा पाठिंबा

    जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र कुरा हे मानसिक छळ तसेच धमकी देत असल्याचे आरोप करत त्वचारोग विभागातील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या आंदोलनाला ‘मार्ड’ संघटनेच्या जे. जे. रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे.

    डॉ. कुरा यांना पदावरून हटवावे, अन्यथा २१ डिसेंबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात येईल, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.

  • 20 Dec 2023 11:59 AM (IST)

    पुण्यात महाविकास आघाडीची बैठक

    पुणे- पुण्यात महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीतर्फे पुण्यात शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची आज पुण्यात बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही बैठक आहे.

  • 20 Dec 2023 11:50 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा रात्री फोन आला, राहिलेल्या विषयांबाबत स्पष्टता करू म्हणाले- मनोज जरांगे पाटील

    “मुख्यमंत्री यांनी काल जे अधिवेशनात मांडलं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी साथ दिली त्याबद्दल मराठा समाजाने कौतुक केलं आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला 100 टक्के न्याय मिळेल. परंतु स्पष्टता हवी. त्यासाठी आम्ही थांबलेले आहोत. एवढं मोठं आरक्षण दिलं आणि यात खुटी ठेवली तर त्या आरक्षणाचा फायदा होणार नाही. मुख्यमंत्री यांच्या वतीने रात्री फोन आला होता आणि ते जे विषय राहिले आहेत त्याबाबत स्पष्टता करू असे म्हणाले आहेत,” अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

  • 20 Dec 2023 11:40 AM (IST)

    भाजपचे मिशन लोकसभा 2024, पंतप्रधान मोदी प्रचाराची धुरा सांभाळणार

    नवी दिल्ली-  2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावरच संपूर्ण जबाबदारी असणार आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक राज्यात दोन ते तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. अनेक राज्यांमध्ये विकास कामांची उद्घाटनं केली जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

     

  • 20 Dec 2023 11:30 AM (IST)

    नवी दिल्ली- कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची बैठक

    नवी दिल्ली- कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बैठक घेतली. “आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. रुग्णालये तयार ठेवावी लागतील. दर तीन महिन्यांनी सगळ्या रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल करा. सगळ्या राज्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य केलं जाणार,” असं बैठकीत सूचित करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची सगळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांसोबत ही बैठक झाली.

  • 20 Dec 2023 11:20 AM (IST)

    आदित्य ठाकरे पुढील महिन्यात पुणे दौऱ्यावर

    आदित्य ठाकरे पुढील महिन्यात पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. खेल समिट कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर जातील. खेल समिटनिमित्ताने जिल्ह्यातील खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. अमित ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही पुण्यावर लक्ष देणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या पुणे दौऱ्याची ठाकरे गटाकडून तयारी सुरू झाली आहे.

  • 20 Dec 2023 11:10 AM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर टीका

    शेतकऱ्यांचा कांद्याचा व्हिडिओ शेयर करत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “कांद्याला बाजार मिळाला नाही याला केंद्र सरकार कारणीभूत आहे. आम्ही हाच मुद्दा उपस्थित केला तर निलंबित करण्यात आलं. शेतकरी सरकारला माफ करणार नाही,” असं त्यांनी लिहिलं.

  • 20 Dec 2023 10:56 AM (IST)

    काळ्याफिती लावून विरोधकांचं आंदोलन

    नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर काळ्याफिती लावून विरोधकांनी आंदोलन सुरु केले आहे. सोयाबीन, कापूस यांना भाव देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विरोधकांनी हे आंदोलन केले. स्पर्धा परिक्षेचा मुद्दा आणि मराठा आंदोलनाच्या मुद्यावर पण विरोधकांनी लक्ष वेधले.

  • 20 Dec 2023 10:48 AM (IST)

    लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

    लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,असे विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यात केले. शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील असे त्यांनी सांगितले.

  • 20 Dec 2023 10:45 AM (IST)

    आम्ही हेडगेवार यांचे श्रद्धेने दर्शन घेतो

    आम्ही हेडगेवार यांचे श्रध्देने दर्शन घेतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यंत्री आज रेशीम बागेतील संघाच्या मुख्यालयात पोहचले. हिंदुत्वाच्या मुद्याचा येथे येण्याशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. रेशीमबागेत एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले.

  • 20 Dec 2023 10:27 AM (IST)

    गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून जाळपोळ

    गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एक जेसीबी सह तीन ट्रॅक्टरची जाळपोळ केली. भामरागड तालुक्यातील हिदुर पोयरकोटी या रस्त्याचे काम काही दिवसापासून सुरू झाले आहे. काल रात्री दहाच्या सुमारास नक्षलवादी ने या कामाच्या वाहनाच्या ठिकाणी येऊन वाहनांची जाळपोळ केली.गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले आहेत.

  • 20 Dec 2023 10:16 AM (IST)

    दरेकर असे का बोलले हे माहिती नाही

    भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. दरेकर असं का बोलले हे मला माहित नाही पण मला त्यांना असं सांगावसं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ हिंदुत्वाचा रक्त आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित झालेले हे रक्त आहे. त्यामुळे भाजपचे नेते जेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकावर येतात तेव्हा आम्ही त्यांना काय म्हणायचं इथे शिवसैनिक आहेत असं नसतं प्रत्येक जण तात्या वास्तूचा आदर करत असतो तोच आदर सन्मान घेऊन आम्ही इथे पोहोचलो, असे ते म्हणाले.

  • 20 Dec 2023 10:07 AM (IST)

    निफ्टीसह बीएसईची दमदार कामगिरी

    भारतीय शेअर बाजार दिवाळीनंतर रंगात आला आहे. आतापर्यंत बीएसई आणि एनएसईने दमदार कामगिरीच्या बळावर नवनवीन रेकॉर्ड नावावर नोंदवले आहे. आज बाजाराने पुन्हा उच्चांकी कामगिरी बजावली. शेअर बाजार उच्चांकावर उघडला. निफ्टीने 21,500 अंकांचा टप्पा तर बीएसई निर्देशांकाने 71,600 अंकांचा टप्पा ओलांडला.

  • 20 Dec 2023 10:02 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

    सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी त्यांना निमंत्रण दिले. जानेवारी महिन्यात असलेल्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर यावेत, अशी विनंती करण्यात आली. रे नगर येथील 15 हजार घरकुलाचा चावी वाटप कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना दिले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे चरित्र ग्रंथ, मंदिराचा फोटो, बाराबंदी पोशाख देऊन त्यांचा सत्कार केला. संसदीय अधिवेशन काळात मंगळवारी पंतप्रधान कार्यालयात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

  • 20 Dec 2023 09:57 AM (IST)

    Live Update : निलंबित खासदारांना लॉबीत प्रवेश नाही

    निलंबित खासदारांना लॉबीत प्रवेश नसल्याची माहिती समोर येत आहे. निलंबित खासदारांनी दिलेल्या नोटीस, ठरावाच्या सूचना ग्राह्य धरण्यात येणार नाहीत… निलंबित खासदार ज्या समितीचे सदस्य असतील त्या समितीच्या बैठकांना हजर राहण्याचा त्यांना अधिकार नाही… दैनिक भत्त्यांना निलंबित खासदार पात्र नाहीत

     

  • 20 Dec 2023 09:45 AM (IST)

    Live Update : अहमदनगर महानगरपालिकेची आज शेवटची महासभा

    अहमदनगर महानगरपालिकेची आज शेवटची महासभा… महानगरपालिकेचे नगरसेवकांचे 31 डिसेंबर मुदत संपणार.. रखडलेले काम आजच्या महासभेत मंजूर होणार का… नेहमीप्रमाणे सत्ताधारी निविरोधक गदारोळ होणार हे पाहणं महत्त्वाचं… सध्या पालिकेत महाविकास आघाडीची सत्ता, तर ठाकरे गटाच्या महापौर… 31 डिसेंबरनंतर प्रशासक येणार असल्याने आजच्या महासभेकडे संपूर्ण नगर शहराचे लक्ष…

  • 20 Dec 2023 09:35 AM (IST)

    Live Update : पुण्यात खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

    पुण्यात खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक.. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा निलंबनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन… पुण्यातील वारजे भागात राष्ट्रवादी काँग्रेस केंद्र सरकार विरोधात करणार निषेध आंदोलन… खासदारांचे निलंबन करून केंद्र सरकारने हुकूमशाहीचा कळस गाठला… राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आरोप

  • 20 Dec 2023 09:25 AM (IST)

    Live Update : श्रेयस तळपदे अद्यापही रुग्णालयातच प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

    अँजिओप्लास्टी नंतर पाच दिवसांत श्रेयस तळपदे याला मिळणार होता डिस्चार्ज, पण अद्यापही रुग्णालयातच… कशी आहे अभिनेत्याची प्रकृती मोठी अपडेट समोर…, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा… वाचा सविस्तर

  • 20 Dec 2023 09:11 AM (IST)

    Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात

    मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात.. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौऱ्याच्या पाचव्या टप्प्याला होणार सुरुवात… 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा जरांगे पाटील यांचा चार दिवस दौरा… बीड जिल्ह्यातील गेवराई कृषी प्रदर्शन उदघाटन जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

  • 20 Dec 2023 08:52 AM (IST)

    Maharashtra News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज अंतिम युक्तीवाद करतील. सकाळी 10 वाजता नागपूरातील विधान भवनात सुनावणीला सुरूवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर 10 जानेवारीपर्यंत निकाल देतील.

  • 20 Dec 2023 08:46 AM (IST)

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा आजपासून पुन्हा मराठा संवाद दौरा

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा आजपासून पुन्हा मराठा संवाद दौरा सुरू होणार आहे. 20 डिसेंबर ते 24 डिसेंबर असा चार दिवस मनोज जरांगे यांचा दौरा असणार आहे. बीड, जालना आणि परभणीत ते मराठा समाजाशी संवाद साधतील.

  • 20 Dec 2023 08:40 AM (IST)

    Winter Assembly 2023 : आजचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

    आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आजचं सत्र हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक मराठा आरक्षणावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अंतिम प्रस्तावावर बोलतील. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची पत्रकीर परिषद होणार आहे.

  • 20 Dec 2023 08:35 AM (IST)

    Maharashtra News : इंडीया आघाडीला 2024 मध्ये आतापेक्षा कमी जागा मिळतील- पंतप्रधान मोदी

    विरोधी पक्षाने विरोधी बाकावरच बसण्याची तयारी केली आहे. इंडीया आघाडीला 2024 मध्ये आतापेक्षा कमी जागा मिळतील असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. भारताचं भविष्य उज्ज्वल बनवणे हे भाजपाचे ध्येय असल्याचेही ते म्हणाले.

  • 20 Dec 2023 08:27 AM (IST)

    Maharashtra News : केंद्रातील पळपूटे सरकार कर्तव्यापासून पळ काढत आहे-सामना

    केंद्रातील पळपूटे सरकार कर्तव्यापासून पळ काढत आहे असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. खासदार निलंबन प्रकरणावरून केंद्रावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सरकारची गेलेली अब्रू मात्र यामुळे झाकली जाणार नाही असंही आजच्या अग्रलेखात म्हंटलं आहे.

  • 20 Dec 2023 08:23 AM (IST)

    Maharashtra News : पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचं पूजन

    पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचं पूजन करण्यात आलं. ट्रस्टच्या अध्यक्षांकडून डोक्यावर कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली.

  • 20 Dec 2023 08:20 AM (IST)

    Maharashtra News : नरेंद्र दाभोळकर हत्त्ये प्रकरणी 2 साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर

    नरेंद्र दाभोळकर हत्त्ये प्रकरणी 2 साक्षीदारांची नावे न्यायालयात सादर करण्यात आली आहे. न्यायालयाकडून साक्षीदारांना हजर राहान्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे.

  • 20 Dec 2023 08:16 AM (IST)

    नंदूरबारच्या सारंगखेडा येथे आजपासून घोड्यांच्या यात्रेला सुरूवात

    पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला सारंखेडा येथील घोड्याच्या यात्रेला आजपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेत जवळपास 600 घोडे दाखल होणार आहे. काही घोड्यांची किंमत ही कोट्यावधींमध्ये आहे.

  • 20 Dec 2023 07:57 AM (IST)

    नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोन नवे साक्षीदार समोर

    नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोन नवे साक्षीदार समोर आले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन संघर्ष समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी बचाव पक्षातर्फे दोन नव्या साक्षीदारांची नावे कोर्टात सादर करण्यात आली.  पुढील सुनावणी वेळी दोन्ही साक्षीदारांना हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत. दाभोलकर प्रकरणी पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी होणार आहेत.  5 जानेवारी रोजी दोन्ही नव्या साक्षीदारांनी हजर राहण्याचा न्यायालयाने समन्स दिलाय.  दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी आत्तापर्यंत एकूण पाच जणांवर आरोप निश्चिती झाली आहे.

  • 20 Dec 2023 07:48 AM (IST)

    सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील डीआरडीओ तज्ज्ञांचे विशेष पथक दाखल

    नागपुरात सोलार इंडस्ट्रीजमधील स्फोटाच्या चौकशीसाठी दिल्लीतील डीआरडीओच्या तज्ज्ञांचे विशेष पथक दाखल होणार आहे. या स्फोटात 6 महिलांसह 9 कामगारांचा मृत्यू झाला आहे. भीषण स्फोटात मृतांच्या देहाचे अवशेष ढिगाऱ्यात गाडले गेले. स्फोट आणि स्फोटकाशी संबंधित विषयात ही डीआरडीओचे पथक निष्णात आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेऊन पुढील तपास करतील. कंपनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही च्या हार्ड डिस्क पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत,सीसीटीव्ही तपासून स्फोटाची तीव्रता लक्षात येणार आहे.

  • 20 Dec 2023 07:42 AM (IST)

    पाण्याची बचत करा; पाटबंधारे विभागाच्या पुणे महानगरपालिकेला सूचना

    शहरातील पाण्याची बचत करा, पाटबंधारे विभागाच्या पुणे महानगरपालिकेला सूचना दिल्या आहेत. पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय नाही. पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेणार आहेत.  अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाणी कपातीचा निर्णय येण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाणीसाठा कमी झाला आहे.  खडकवासला धरण साखळी क्षेत्रात आता केवळ 23.2 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

  • 20 Dec 2023 07:37 AM (IST)

    छगन भुजबळ यांच्याविरोधात कोल्हापुरात आंदोलक

    मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळ फासून तोंडात शेण चारलं. मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केल्यामुळे सकल मराठा समाजाचा संताप पाहायला मिळाला. ऐतिहासिक दसरा चौकात आक्रमक आंदोलन करत लक्ष वेधलं.