महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेला आता अवघे काही तासच उरले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं असून सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जतना पक्षाचे ज्येष्ठ, मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. आज संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आझाद मैदानात त्यांचा शपथविधी पार पडेल. याचदरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या लहानपणीचा एक फोटो व्हायरल झाला असून ते त्यामध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत दिसत आहेत. फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार असताना, ते लहानपणापासून भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट करणारा हा फोटो वेगाने व्हायरल झाला आहे.
कसं होतं अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी नातं ?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचं अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी खूप जुनं नातं होतं. फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवसी यांचं अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी चांगलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीबद्दल बोलायचं झालं तर याचं क्रेडिट भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना जातं. त्यांनीच नागपूरमध्ये फडणवीस यांची अटलबिहारी वाजेपयींशी पहिली भेट घडवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वाजपेयींशी झालेल्या भेटीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना त्यांची स्वाक्षरी घ्यायची होती. काही वेळाने फडणवीस यांना वाजपेयींना भेटण्याची संधी मिळाली. यादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांची प्रेमाने भेट घेतली आणि फडणवीस यांच्या कामाचं कौतुकही केले.
अटलबिहारी वाजपेयी हे माझा आदर्श आहेत, असं फडणवीसांनी याआधीही अनेकवेळा सांगितलं आहे, लहानपणापासून वाजपेयींचं राजकारण पाहून, त्यांचा अभ्यास करून फडणवीसांनी स्वत:ला तयार केलं.
‘मेरा पानी उतरता देख कर…’
सध्या फडणवीस यांचा केवळ अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतचा फोटोच व्हायरल होत नाहीये तर त्यांच्या तोंडून निघालेल्या काही ओळीही सोशल मीडियावर गाजत आहेत. 2019 साली त्यंनी अजित पवारांसोबत मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची तुलना समुद्राशी केली होती. मी पुन्हा येईन हे त्याचं वाक्य खूप गाजलं होतं.
काय म्हणाले होते फडणवीस ?
“मेरा पानी उतरता देखकर किनारे घर मत बनाना, मैं समंदर हूं लौटकर आऊंगा. मैं अभिमन्यु हूं, चक्रव्युह तोड़ना आता है.”
त्यांच्या या ओळी, तो व्हिडीओ खूपच गाजला असून तोच आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लहानपणापासूनच RSS शी संबंध
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 1970 साली झाला. फडणवीस यांचा लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसकडे कल होता. यामुळेच ते लहानपणापासून शाखेत जायचे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांचे वडील गंगाधर राव फडणवीस, ते सुरुवातीपासून RSS आणि जनसंघाशी संबंधित होते.