BJP Suspend 40 workers : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसह महाविकासाआघाडीत बंडखोरी पाहायला मिळाली. महायुतीत भाजपमधील बंडखोरांची संख्या सर्वाधिक आहे. आता या बंडखोरांवर भाजपने कडक कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश न मानल्याचा ठपका ठेवत तब्बल 40 जणांची पक्षांकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपकडून नुकतंच एक अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत आहे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भाजपने राज्यातील 37 विधानसभा मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी हे परिपत्रक काढले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. बंडखोरी करणाऱ्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार तब्बल ४० जणांवर निलंबित करण्यात आले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बंडखोरांवर अद्याप कारवाई केलेली नाही. भाजपच्या कारवाईनंतर आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार बंडखोरावर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.