मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यात सर्वत्र सभा घेत आहेत. पुणे आणि मुंबईत त्यांची सोमवारी सभा झाली. मंगळवारी नाशिक जिल्ह्यात त्यांची सभा होणार आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची खराब झाली आहे. त्यामुळे मुंबई मनपाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपायोजनाची पाहणी करण्यासाठी सकाळी सहा वाजताच पोहचले. पुणे शहरात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमावरुन अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बागेश्वर बाबा यांच्यात वाद पेटला आहे. ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. देश, राज्यातील आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर…
नागपूर : देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला शरद पवारांची सभा होण्याची शक्यता आहे. नागपूरला पुढील महिन्यात शरद पवारांची सभा होणार आहे.
बुलढाणा | मनसे बुलढाण्याची लोकसभा जागा लढवणार आहे. कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आलाय. शेगाव येथील आढावा बैठकीत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. शेगावमध्ये आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
सोलापूर | विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजेचा मान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक महापूजा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे.
पालघर | मनोज जरांगे पाटील यांची आज बोईसर मध्ये जाहीर सभा होणार आहे. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. जरांगे पाटील यांचं संध्याकाळी 7 वाजता सभास्थळी आगमन होईल. बोईसर येथील सर्कस मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात जरांगे पाटील यांची पहिलीच सभा आहे. त्यामुळे मुंबई आणि नजीकच्या जिल्ह्यातील मराठा समाजात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे | पीएमपी प्रशासनाला एका दिवसात 2 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पीएमपी प्रशासनाला सोमवारी 20 नोव्हेंबर रोजी हे उतपन्न मिळालं आहे. पीएमपी प्रशासनाने दिवाळी सुट्टीनंतर वेगवेगळ्या मार्गावर बस सोडल्या होत्या. विविध मार्गांवर जवळपास 1 हजार 698 बस सोडण्यात आल्या होत्या. तब्बल 12 लाख जणांनी प्रवास केला. यातून पीएमपी प्रशासनाला 2 कोटी 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.
कोल्हापूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. शेतकऱ्यांवरील संकट दूर होवोत, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी अंबाबाई चरणी घातलं. तसेच यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कुणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणार असंही म्हटलं.
पंढरपूर येथे मराठा आंदोलक आणि प्रशासनाची बैठक संपली आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा भवनसाठी पाच एकर जागा ,मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटी रुपये निधी तात्काळ मंजूर करावा तसेच मराठा मुला-मुलींसाठी वसतिगृह आणि सारथी संस्थेचे कार्यालय पंढरपूरमध्ये सुरु करावे , पंढरपूर येथील तहसील कार्यालयसमोर साखळी उपोषण स्थळी उपमुख्यमंत्र्यांनी येऊन भेट द्यावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. या मागण्यावर 6 वाजेपर्यंत सरकारने विचार करावा. प्रशासनाला एक तासाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आता 24 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. आजच्या सुनावणीत तिन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. इंदोरीकर महाराज आजही अनुपस्थित होते. 24 नोव्हेंबरला जामीन अर्जावर न्यायालय निर्णय घेण्याची शक्यता आहे. जामीन घेण्यासाठी इंदोरीकर यांनी स्वतः हजर राहावे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तिन्ही पक्षांच्या युक्तिवादावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर आंदोलकांनी तोडफोड केली. हे आंदोलक निवेदन देण्यासाठी आले होते. पण जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्रशासकीय अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने आंदोलक संतप्त झाले. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले असा आरोप नेते गोपीचंद पडाळकर यांनी केला. या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, अशी विनंती त्यांनी केली.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. धनगर आंदोलक निवेदन देण्यासाठी आले असता, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कार्यालयातील काचा आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यासाठी आंदोलक आले होते.
यापुढे आंदोलन होऊ नये ही शासनाची जबाबदारी आहे. मराठा आरक्षण देण्याचा सरकारने शब्द दिला आहे. 26 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं. सरकार जे बोलले त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. आरक्षण नाही मिळालं तर रस्त्यावर उतरू असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. अतरवाली सराटी येथील आंदोलनात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
बारामती : शहरातील बेकायदेशीर ॲकॅडमी आणि क्लासेसवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी गेल्या सहा दिवसांपासून चक्री उपोषण सुरु केलंय.. या मागणीबाबत प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं आज उपोषणस्थळी ढोल ताशा वाजवत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाशीम : विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुनावणीवर सुनावणी सुरू आहे. सुनावणीच्या बातम्या ऐकल्या की दामिनी पिक्चरातील तारीख पे तारीखचा डायलॉग आठवतो आणि नार्वेकरांना पहिले की त्या चित्रपटातील अडव्होकेट चड्डा आठवतो, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. ओबीसीची बाजू मांडताना वैयक्तिक पातळी खालवणार नाही याची काळजी जरांगेनी पण घ्यावी. दोघांनी एकत्र येऊन भाजपला प्रश्न करावा. जरांगेचं कालचे स्टेटमेंट मला आवडलं नाही. त्यांच्या जातीवरील वक्तव्यामुळे गावागावाची वीण उसवत आहे, असे त्या म्हणाल्या.
धाराशिव : धाराशिव येथील वाशी पोलीस ठाण्यात मराठा समाजाने ठिय्या आंदोलन सुरु केलेय. समाजाने आक्रमक भुमिका घेत पोलीस आणि सरकारचा निषेध केला. गुन्हे दाखल करुन शांततेच्या मार्गाने चालु असलेले आंदोलन दडपले जात आहे असा आरोप समाजाने केला. भुम तालुक्यातील ईट येथे जरांगे पाटील यांची सभा झाली होती. या सभेचे आयोजन करणाऱ्या संदीपान कोकाटे आणि प्रवीण देशमुख या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याचा निषेध करत मराठा समाजाने हे पोलीस ठाण्यात आंदोलन सुरु केले आहे.
नेरुळ : अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी सागर पवार या युवकाने नेरुळ ते तुळजापूर असा पायी प्रवास सुरू केलाय. नेरुळ ते तुळजापूर पदयात्रेचा आजचा सातवा दिवस आहे. सागर पवार हा तरुण 185 किलोमीटरचे अंतर पायी चालून पाटसपर्यंत पोहोचला आहे.
नामदेवराव जाधव शाई फेक प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर झाला आहे. नामदेवराव जाधव प्रकरणात ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काल कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मात्र आता ५ जणांना जामीन मंजूर झाला आहे.
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कारखानदारांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मागितली होती. अहमदनगर आणि नाशिक भागातील पाणी त्याच भागासाठी राहावे अशी मागणी कारखानदारांची होती. आता या पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे.
नवी दिल्ली : मराठवाडा पाणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठवाड्यासाठी मोठी दिलासादायक बातमी पुढे आली आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात ८.५ टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम राखला आहे.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते करवीर निवासिनी अंबाबाईचं सहकुटुंब दर्शन घेणार आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूरला अचानक दौरा होत आहे.
चंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वनमंत्री यांच्या विरोधात सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडिओ पुढे आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर शिवीगाळ करत जीवे मारण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहाच्या नुतनीकरणासंदर्भात ही बैठक होणार आहे. विधानभवनात संध्याकाळी ४ वाजता ही बैठक होणार आहे.
मुंबई : ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे कागदपत्र सादर. तर शिंदे गटाला २४ तारखेपर्यंत कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सुनावणीसाठी विटनेस बॉक्स देखील लावला जाणार आहे. सुनील प्रभू यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला जाणार आहे.
पुणे : पुण्यातल्या पक्ष कार्यालयात आज युवक शहराध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. पुणे लोकसभा हा आतापर्यंत काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे.
यवतमाळ : पीकविम्याची तोकडी रक्कम मिळाल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी समोर ही घटना घडली. रिलायन्स विमा कंपनीच्या इंचार्जच्या चेहऱ्याला काळे फासण्यात आले. यवतमाळ तालुक्यातील यावली गावात हा प्रकार घडला.
संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री शिंदेंसोबत लवकरच बैठक घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शिष्टमंडळासह शिंदेंसोबत बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार गटाची देवगिरीवर बैठक होणार आहे. मराठा आरक्षणावर छगण भुजबळांनी घेतलेल्या भूमीकेमुळे खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. सरकार कुणबी नोंदी शोधण्याची मोहिम युद्ध स्थरावर राबवत आहे. मराठ्याच्या कुणबी नोंदी सापल्याने आता आम्हाला आरक्षण मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठा समाजाचं आंदोलन शांततेत सुरू आहे असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा तरूणांवर दाखल झालेले गुन्हे अजुनही परत घेतले नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटिल यांची आज ठाण्यात सभा आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या आणि मोकळे व्हावे, तुमचं तुम्ही खा आमचं आम्हाला खावू द्या असं म्हणत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यावर जरांगे पाटील यांनी टोला लगावला.
जातीय दंगली भडकावून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय. आम्ही कायदा-सुव्यवस्था राखतोय, तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. मराठी आणि ओबीसीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करतोय, असं जरांगे पाटील म्हणाले.
मराठ्यांच्या जवळपास 32 लाख ओबीसी नोंदी सापडल्या आहेत. आतापर्यंत 85 टक्के लढा झाला. ताळमेळ हुकला नाही म्हणून इथवर आपण लढा जिंकलो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शरद पवार यांना वर्ल्ड कपच्या फायनलचे निमंत्रण नव्हते. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. शरद पवार यांनी बीसीसीआय आणि आयसीसीचं अध्यक्ष पद भूषवले असल्याने त्यांना निमंत्रण देणं अपेक्षित होतं. मात्र शरद पवार, कपिल देव यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.
अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील 23 नोव्हेंबरला अमरावतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील 24 तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. जिल्हा नियोजन बैठकीत जिल्ह्यातील सर्वच कामाचा विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे. पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पाटील यांचा हा दुसऱ्यांदा अमरावती दौरा आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्याचं काम सुरू असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने थांबवली आहेत. गॅन्ट्री बसविण्यासाठी पुढील दोन तास महामार्ग बंद असणार आहे.
अहमदनगर : गुहा गावाचे ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला आहे. या मोर्चात गुहा गावातून मोठ्या संख्येने गावकरी आणि वारकरी सहभागी झाले आहेत. गुहा गावात भक्त आणी पुजाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. भजनाच्या साहित्याची तोडफोड केल्याने वारकरी संतप्त झाले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर इंडिया आघाडीची बैठक… पाच राज्याच्या विधानसभेचा निकाल ३ डिसेंबर ला लागणार आहे… त्यानंतर लोकसभा जागा वाटपाला होणार सुरूवात… पाच राज्यात कॉंग्रेसला यश आले तर राज्यात कॉंग्रेस अधिक जागा मागणार… इंडिया आघाडीच्या विश्वसनीय नेत्याची माहिती
राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर आज दुपारी अडीच वाजता बैठक आहे. बैठकीला सदाभाऊ खोत यांच्यासह सहकारी आणि खासगी दूध संघाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात जाहीर सभा आहे. २५ जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांची ऊधळण केली जाणार आहे. या सभेआधी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या पाटील यांचा भव्यदिव्य रोड शो होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकांत, मुख्य नाक्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या परिसरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची सभा सोमवारी कल्याणमध्ये पार पडली. सभेनंतर जरांगे यांनी कल्याणमध्ये मुक्काम केला आणि सकाळी त्यांनी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर जात देवीचे दर्शन घेतले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला… राज ठाकरे यांना 20 लोकसभा मतदारसंघाचे अहवाल सादर… मनसेनं लोकसभा निवडणूक लढवावी पक्षाला चांगला प्रतिसाद निरीक्षकांचे अहवाल… उद्या लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे घेणार बैठक… दोन दिवसात आढावा घेवून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार
राहुरी तहसीलवर वारकरी आणि गुहा ग्रामस्थांनी मोर्चा काढण्यात आला. गुहा येथील भक्त आणि पुजाऱ्यांना मारहाण झाली होती, त्यामध्ये मृदुंग आणि भजनाच्या साहित्याची विटंबना केली होती .
यामुळे वारकरी संप्रदाय संतप्त झाला असून, गुहा गावातून वारकरी राहुरी येथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. तहसीलवर मोर्चा काढत कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
मुंबईतील कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्समधील दुकानाचे शटर तोडून चोरी करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
20 नोव्हेंबर रोजी ही चोरी झाली असून सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे चोरी करताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समता नगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
डीएस कुलकर्णी यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची मागणी करण्यात येत आहे. मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी न्यायालयात अर्ज केला आहे.
195 मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी देण्यात यावी, असी मागणी करण्यात आली आहे. डीएके यांच्या मालमत्तेचे मूल्य 576 कोटी रुपये इतके आहे.
मनोरुग्ण कोण?, हे येणाऱ्या काळात कळेल, ते जनताच ठरवले. स्वत:चं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पहाव वाकून.. अशी फडणवीसांसह भाजपाची विकृती आहे, असे टीकास्त्र राऊतांनी सोडलं.
मुंबई आणि महाराष्ट्र कोणाच्याही घशात घालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपासारखा भ्रष्ट पक्ष देशात नाही . भाजप म्हणजे ‘भारतीय जुगार पार्टी’ असे सांगत संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला.
भाजपाने माझं ट्विट अंगावर ओढवून का घेतलं ? बावनकुळेंच्या कृत्यामध्ये चुकीचं काय आहे, ते मनाला का लावून घेतलं? असा खडा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठाण्यातील माजीवाडा जंक्शन या ठिकाणी 25 जेसीबी लावण्यात आलेले आहे .या 25 जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करत त्यांचा स्वागत केल जाणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समन्वय जमण्यास सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज जरांगे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा पार पडणार आहे .त्यापूर्वी ठाण्यात ठीक ठिकाणी जरांगे यांना सलामी देत स्वागत देखील केल जाणार आहे
कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून पळाला. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधव याला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील बंदी यांची तुरुंग अधिकारी गिनतीकरता वेळेस आरोपी अशीष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. येरवाडा करागृहातून कैदी पळाल्याने खळबळ उडाली.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांची मुलगी आणि सुनेविरोधात सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं आहे. 2021 साली सीबीआयचा अंतर्गत अहवाल लीक झाल्याचं हे प्रकरण आहे. अहवाल मिळवण्यासाठी सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांना देशमुखींचे वकिल आनंद डागा यांनी कथित लाच दिली होती. मुलगी पुजावर डागा यांना मदत केल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.
पीक विमा योजनेंतर्गत भरपाईसाठी ९६५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. पीक नुकसान भरपाईचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या विम्याची आगाऊ रक्कम वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विमा योजनेंतर्गत आतापर्यंत ४७ हजार ६३ हजार नुकसान भरपाई मागणीचे अर्ज मंजूर झाले. उर्वरित निधीही येत्या दोन आठवड्यात उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीय.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मुंबईवरून पुण्याच्या दिशेने असणारी वाहतूक पूर्ण बंद राहणार. द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने गंट्री बसविण्यात येणार असल्याने ब्लॉक. मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास जुन्या मुंबई – पुणे मार्गावरून वळवणार
दिवाळीत पावणे दोन लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास. दिवाळीच्या कालावधीत मेट्रोला मिळाले 35 लाख 86 हजार रुपयांचे उत्पन्न. रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवास करण्याऐवजी अनेकजण मेट्रोच्या एसी प्रवासाला पसंती देत आहेत. सुखकर, आरामदायी आणि कमी वेळेत प्रवास होत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकर नागरिक मेट्रोची सफर करतात.
जायकवाडीच्या पाणी वाटपाला स्थगिती देण्यासाठी करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी. 2014 साली समन्यायी पाणी वाटप करताना घेतलेल्या निर्णयाविरोधात ही सुनावणी होणार. नगर जिल्ह्यातील काळे, कोल्हेसह विखे पाटील यांच्या साखर कारखान्यांच्या याचिकेवर आज सुनावणी.
अपत्य प्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणार्या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होईल. मागील दोन्ही सुनावणींना इंदोरीकर महाराज होते अनुपस्थित. मागील सुनावणी वेळी वकिलांमार्फत त्यांनी जामिनासाठी अर्ज केलाय दाखल.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जात आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे हा दौरा करणार आहे. यावेळी कार्यकत्यांच्या घरी जावून ते बैठका घेणार आहे. त्यांचा दौरा दोडामार्गपासून सुरु होणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील संभाव्य उमेदवार किशोर जैन यांच्या घरी सुद्धा ते जाणार आहेत.
नवी मुंबईतील सिवुड्स येथील दुकानात एका व्यक्तीने थेट तलवार काढत धिंगाणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे मालकाचा नंबर मागितला मात्र कर्मचाऱ्याने काही नंबर दिला नाही. काही वेळाने तो व्यक्ती पुन्हा तलवार घेऊन आला आणि राडा करू लागला. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
बागेश्वर धाम सरकार यांचे अनिसला प्रतिआव्हान दिले आहे. आक्षेप असतील तर दरबारात आमनेसामने या. चर्चा करु. हिंदू एकता व भारतीय संस्कृतीची जपणूक करणे, ती वाढवणे यासाठी आमचा दरबार असतो. त्यावर आक्षेप असतील तर दरबारात या, आमनेसामने करू, असा प्रतिआव्हान धीरेंद्र शास्त्री यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीला दिले.
मनोज जरांगे पाटील आज आणि उद्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे मनोज जरांगे पाटील दाखल होणार आहेत. त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन ते सभा घेणार आहेत. उद्या सकाळी इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.