मुंबई | 23 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्रात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणासह ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. याचसोबत पंढरपुरात आज कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना त्यांनी केली. याचसोबत राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रातही सातत्याने नव्या घडामोडी घडत आहेत. यासह मनोरंजन आमि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. त्यासाठी आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
नवी दिल्ली | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती आणि खिसे कापू म्हटल्याच्या विरोधात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण द्यावं असंही या नोटीसमध्ये म्हटलंय. राहुल गांधींना
25 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहुल गांधींनी निवडणूक आयोगात उत्तर द्यावं लागणार आहे.
ठाणे | महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. या दिंडीला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ कवयित्री डॉ प्रज्ञा दया पवार , जगदीश खैरालिया आणि अभय कांता यांनी दिली.
इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धात गाझामध्ये आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध अजून किती काळ चालू राहील हे सध्या सांगणे कठीण आहे.
विश्वचषकाचा अंतिम सामना जर ईडन गार्डन्स किंवा वानखेडेवर खेळवला गेला असता तर आम्ही सामना जिंकला असता, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
कार्तिकी एकादशीची पूजा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांना इशारा दिला आहे. प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्द अपशब्द, आकस नको असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर फडणवीस आणि दादांनी त्यांच्या माणसांना थांबवावं असं जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेना आमदार आपात्रतेची सुनावणी आज संपली आहे. पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे. सुनील प्रभू यांनी दोन वेगवेगळे स्टेटमेंट विधानसभा अध्यक्षांसमोर दिले आहेत. व्हीप बजावण्याचं उत्तर त्यांनी जे दिलं ते काही समाधानकारक नाही. सुनावणी लांबवण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांनी खोटे कागदपत्रं सादर केली आहेत.
अजित पवार आणि शिंदे गटाचे आमदार खासदार भाजपात जाणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांना कमळाबाईच्या पदाराखाली निवडणुका लढवाव्या लागतील अशी बोचरी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
मराठा आरक्षणाबाबत काम करणारी न्यायमूर्ती शिंदे समिती सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. दोन दिवस ही समिती विदर्भात आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि शिष्ट मंडळाने शिंदे समितीची भेट घेतली. जेवढ्या लोकांचा सर्व्हे होईल,एवढ्या लोकांच्या नोंदी सापडल्या, आकडा जाहीर करावा, श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी मध्ये ज्या 400 जाती येतात या जातीचे देखील आणि कुटुंब यांच्याजवळ जात प्रमाणपत्र नाही, ओबीसीचा प्रमाणपत्र आहे पण 1967 पूर्वीचा पुरावा मिळत नसल्याने त्याला व्हॅलिडीटी मिळत नाही, आणि म्हणून ते आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही, सर्व समाजाला समान न्याय द्यायचा असेल त्यामध्ये ओबीसी मध्ये येणाऱ्या पूर्ण जातीचा आपण शोध घ्यावा, शेतपत्रिका राज्यात जाहीर करावे जेणेकरून ओबीसी झालात त्या जात्यांना मिळेल असा निवेदन त्यांनी शिंदे समितीला दिले.
ठाणे नंतर मीरा भाईंदर मध्ये कंटेनर शिवसेना शाखेचा वाद वाढण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी १३ नोव्हेंबर रोजी पदपथांसह सार्वजनिक ठिकाणी कंटेनरमध्ये सहा शिवसेना शाखांचे उद्घाटन केले होते. शिवसेना शिंदे गटाकडून उभारलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बेकायदेशीर कंटेनर शिवसेना शाखेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून विरोध केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेसह मनसे , कांग्रेस सहित विरोधी पक्षांनी बेकायदेशीर शिवसेना शाखेचा कंटेनर हटवण्याची मागणी मीरा भाईंदर मनपा आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे.
यवतमाळचे माजी खासदार हरीभाऊ राठोड यांना धमकी देण्यात आली. ओबीसी आरक्षणला धक्का लावू अशी भूमिका घेतल्याने धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयीचीचे पत्र दिले आहे. त्यांनी यामध्ये वाय प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
गेल्या पाच तासांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे बेंगलोर हायवेवर रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हायवेवर ठाण मांडून बसले आहेत. आंदोलकांना भेट देण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती गठित केली आहे. ही समिती सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि शिष्ट मंडळ शिंदे समितीला भेटण्यासाठी दाखल झाले आहे. शासकीय निवासस्थान रवी भवनामध्ये ते शिंदे समितीची भेट घेणार आहेत.
इंदोरीकर महाराज यांना संगमनेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. अपत्य प्राप्तीवरुन त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. त्यांच्याविरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या वक्तव्याप्रकरणात इंदोरीकरांना जामीन मंजूर झाला आहे. 24 नोव्हेंबरला जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. पण त्यापूर्वी नियोजीत कीर्तन होणार असल्याने त्यांनी लवकर सुनावणीची विनंती केली होती. त्यांना 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
जळगावात मंत्री गिरीश महाजन यांच्या फोटोला काळ फासण्यात आले. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या बद्दल आजारपणाच ढोंग केल्याचे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गिरिश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत निवडणूक आयोगात उदया (शुक्रवारी) सुनावणी पार पडणार आहे. अजित पवार गटाच्या वतीने आता मंत्र्यांची देखील उपस्थिती असणार आहेत. मंत्री अनिल पाटील, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार. यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित राहणार तर शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, जितेंद्र आव्हाड, उपस्थित राहणार आहेत.
धनगर समाजाच्या आदिवासींमध्ये संभाव्य समावेशाविरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. इतरांना आरक्षण देताना आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी पुण्यामध्ये भव्य मोर्चा निघालाय. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय.
खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे. विकासकामासाठी भेट घेतल्याचा अमोल कोल्हेंनी दावा केला आहे. मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती उठवण्यासंदर्भात भेट घेतल्याची माहिती दिली आहे. अमोल कोल्हेच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जळगाव : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा चेंडू हा अध्यक्षांच्या दालनात आहे. त्यामुळे त्यावर बोलणे उचित होणार नाही. ३१ डिसेंबर ही सरकारची डेडलाईन आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील यांनी जो दावा केला आहे, त्या संदर्भात भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलले आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित होणार नाही असेही ते म्हणाले.
मुंबई : कापूस आणि सोयाबीन प्रश्नावर स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनी सहकार मंत्री तथा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या प्रश्नावर तुपकर यांनी सरकारला 28 तारखेपर्यंत अल्टी मेटम दिलाय. सरकारने तोपर्यंत निर्णय घेतला नाही तर 29 तारखेला मंत्रालय ताब्यात घेणार असा इशारा तुपकर यांनी दिलाय. त्यावर, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊ. तुपकर याना मंत्रालयात येण्याचे काम पडणार नाही असे आश्वासन दिलंय.
अमरावती : आम्हाला भाजपमध्ये पक्ष विलीन करा असे म्हटलं होतं. पण आम्ही पक्ष विलीन केला नाही. आम्ही होतो म्हणून भाजपचे सरकार आलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला कोण ओळखत होत? अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपवर केली. भाजप छोट्या छोट्या पक्ष्याला टेकू बनवत आणि मोठा होऊ पहात आहे. तर… मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कर्जत : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खोपोली इथल्या रमाधाम आश्रमात दाखल झालेत. वृद्धाश्रमात फराळ वाटून ते दिवाळी करणार साजरी करणार आहेत. याच ठिकाणी ठाकरे हे मावळ लोकसभा आणि कर्ज विधानसभा निहाय बैठक घेणार आहेत. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे हे शिंदे गटामध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी ठाकरे गटाकडून नवा आणि आश्वासक चेहरा दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. सुरेशदादा जैन यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तब्बल तासभरच्या भेटीत दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली. सुरेशदादा यांनी मतदारसंघातील विकासकामांबाबत मार्गदर्शन केल्याची गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली.
उत्तरकाशी येथे एका टनलमध्ये अडकलेल्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री धामी देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. अनेक हल्ल्यात तो मास्टर माईंड होता.
भिवंडी : भिवंडीत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर फेरीवाले, दुकानदारांकडून दगडफेक, पोलिसांकडून सौम्य लाठीमार. दोन दिवसांपूर्वीच प्रभाग समिती क्रमांक तीन मध्ये फेरीवाले दुकानदारांकडून अतिक्रमण पथकावर झाली होती दगडफेक.
नेवासात मनोज जरांगे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली आहे. या सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर पु्न्हा एकेरी भाषेत टिका केली आहे. भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ऊसाला दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरु मार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे.
आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी 31 डिसेंबरआधी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच असे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. साल 2024 मध्ये नवीन सरकार येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी कोकण दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यात त्यांनी स्थानिकांच्या खळा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. कोकणाचा विकास झाला पाहिजे असे या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर : नेवासा शहरात थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा सुरू होणार आहे. मात्र सभेआधी मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. रामेश्वर घोंगडे असं या व्यक्तीचे नाव असून तो धनगर समाजाचा आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तो आजच्या सभेत सहभागी झाला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आज खोपोलीत विधानसभा आणि लोकसभा निहाय बैठक होणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर ही बैठक होणार आहे. या बैठकीत मावळ लोकसभा निवडणुकीचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. इथं श्रीरंग अप्पा बारणे हे सध्या खासदार आहेत, जे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडून नवा आणि आश्वासक चेहरा दिला जाणार असल्याची माहिती आहे. तसंच कर्जत विधानसभेसाठी महेंद्र थोरवे हे आमदार आहेत, जे शिंदे गटात असल्याने त्यांच्या जागीही आश्वासक चेहरा दिला जाणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन करणार आहेत.
नवी दिल्ली : विश्वचषकाच्या पराभवाबाबत आसाम मुख्यमंत्र्यांनी हास्यस्पद वक्तव्य केलं आहे. इंदिरा गांधींच्या जयंती दिवशी सामना खेळण्यात आल्याने भारताचा पराभव झाल्याचं वक्तव्य केलंय. यापुढील अंतिम सामना हा गांधी घराण्याशी संबंधित नसावा, असं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा म्हणाले. काँग्रेस आणि भाजपमध्ये विश्वचषकाच्या पराभवावरून अजूनही कोल्ड वॉर सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.
गोवा : 26 जानेवारीपासून गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया होणार आहे. गोमेकॉमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी ही माहिती दिली आहे. सरकारी क्षेत्रातील गोमेकॉ हे देशातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.
आमचं सरकार आल्यानंतर कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही असं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. आम्ही अधिवेशनात श्वेत पत्रिका जाहीर केली होती त्यावरून आमचं सरकार आल्यानंतर कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही हे सिद्ध होते असेही ते म्हणाले.
नागपूरात हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ यांना रवी भवन परिसरातील 1 नंबरचा बंगला देण्यात आला आहे. छगन भुजबळ यांचे या बंगल्यात वास्तव्य असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दोन नंबरचा बंगला हा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आला आहे. तीन नंबरचा बंगला महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांना देण्यात आला आहे.
पंढरपूर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीरा नरसिंगपूर येथील कुलदैवतेचे दर्शन घेतले. यावेळी काही मंत्री देखील येथे उपस्थित होते.
विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात कार्तिकी एकादशी निमीत्त मोठ्या प्रमाणात भक्त दाखल झाले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज या महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहिल.
आषाढी प्रमाणे कार्तिकी एकादशीलाही विठुरायाच्या दर्शनासाठी पांडुरंगाचे भक्तांना आस लागली आहे. कार्तिकी एकादशीसाठी ठाणे जिल्ह्यातून जादा 139 एसटी बसेस नियोजन केले आहे .त्यानुसार 20 नोव्हेंबरपासून काही बस पंढरपूरला रवानाही झाले आहेत.
ठाण्यातील 43 अनधिकृत शाळांवर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली. शैक्षणिक वर्षात तब्बल 43 अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक शाळा या इंग्रजी माध्यमाच्या असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे .
कार्तिकी एकादशी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या देहूत आज भाविकांची मोठी गर्दी झाली. कार्तिकी एकादशीला ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही, त्या भाविकांनी आज सकाळपासूनच संत तुकाराम महाराजांच्या देहूत भाविकांनी गर्दी केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावती दौऱ्यावर येत आहे. नुकतीच अमरावती अकोला मार्गावर अखंड रस्ता निर्मितीचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. आता नितीन गडकरी यांच्या हस्ते लोणी ते मूर्तीजापूर मार्गाचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड टॉवरचे लोकार्पण केले जाणार आहे. अमरावती-अकोला 84 किलोमीटरचा रस्ता अवघ्या 105 तासात पूर्ण झाला होता.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजस्थानमध्ये राहणार उपस्थित. थोड्याच वेळात विमानाने निघणार राजस्थानला.
एका दिवसात तब्बल एक कोटी 41 लाख रुपयांची कमाई. एका दिवसात 1 लाख 38 हजार प्रवाशांनी केला एसटीने प्रवास. 20 नोव्हेंबर या दिवशी सवलतींसह 1 कोटी 41 लाख एसटीच्या तिजोरीत जमा. यावर्षीची सर्वात मोठी एसटीची ही रेकॉर्ड ब्रेक कमाई.
स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे-बँगलोर महामार्ग रोखणार. राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते होणार आंदोलनात सहभागी. स्वाभिमानी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बँगलोर महामार्गावर शिरोली जवळ मोठा पोलीस बंदोबस्त.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी सिलक्यारा टनेलमध्ये मागच्या 12 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. या सगळ्या मजुरांची आज सुटका होऊ शकते. वाचा सविस्तर….
अमरावतीच्या रिद्धपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने अमरावती बंदचे केलेले आवाहन रद्द केले. त्यामुळे अमरावती शहरातील बाजारपेठ सुरळीत सुरू राहणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि पोलीस आयुक्त यांच्यात काल सायंकाळी चर्चा झाल्यानंतर बंदचे आवाहन करण्यात रद्द आले. कुणी बेकायदेशीर बंद करेल तर त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका बाजारपेठ सुरू राहील असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे उद्या अमरावतीमधील सर्व बाजारपेठा सुरळीत सुरू राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यात पाण्याचं मोठं संकट पाहायला मिळतंय. १०४ टँकर्स १३१ गावे आणि २३७ वाड्यांची तहान भागवत आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ३७ गावे आणि १६२ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी ७ तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूर जाणाऱ्या प्रवाश्यांची पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात गर्दी झाली आहे. स्वारगेट बसस्थानकातून पंढरपूर आज ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गर्दी स्वारगेट बसस्थानकात पाहायला मिळतेय. काल संध्याकाळपासून वारकऱ्यांची स्वारगेट बसस्थानक परिसरात गर्दी आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. फडणवीसांसोबत विठूरायाची शासकीय महापूजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मानदुमला गावच्या बबन घुगे आणि सौ वत्सला घुगे यांना मिळाला. पहाटे 2:20 वाजता सुरु झालेली शासकीय महापूजा 3:25 ला समाप्त झाली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.