आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. नव्या मंत्र्यांनी आज नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिदे गटाच्या 11 मंत्र्यांनी शपथ घेतली.
या दिग्गजांना धक्का
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर ही विधानसभेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे 57 उमेदवार विजयी झाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून जेव्हा उठाव केला तेव्हा त्यांच्यासोबत दीपक केसरकर देखील होते. दीपक केसरकर यांनी या उठावानंतर एकनाथ शिंदे यांची बाजू ठामपणे मांडली, उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटावर त्यांनी घणाघाती टीका केली. त्यांना उठावानंतर स्थापन झाललेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं होतं, मात्र आता नव्या मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाला आहे. दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच तानाजी सावंत यांना देखील यावेळी मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाहीये. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत अब्दुल सत्तार देखील होते, मात्र यावेळी अब्दुल सत्तार यांची देखील मंत्रिपदाची संधी हुकली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नव्या मंत्र्यांची यादी
गुलाबराव पाटील
दादा भुसे –
संजय राठोड
उदय सामंत
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
भरत गोगावले
प्रकाश आबिटकर
आशीष जैस्वाल – राज्यमंत्री
योगेश कदम – राज्यमंत्री
संजय शिरसाट यांना मंत्रिपद
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर त्यांच्यासोबत संजय शिरसाट देखील होते. ते देखील मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र गेल्या वेळी त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही, यावेळी मात्र अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाला असून, दुसरीकडे संजय शिरसाट यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. हा सत्तार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.