महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची वर्णी लागली. या शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालाचाली सुरु आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटात मंत्रिपदासाठी अनेक नेते लॉबिंग करताना दिसत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदेकडून आमदारांची नाराजी टाळण्यासाठी मोठी खेळी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना शिंदे गटात अडीच-अडीच वर्षासाठी मंत्रिपदाची विभागणी करण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे ६० आमदार निवडून आले. या आमदारांपैकी काही निवडक लोकांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. मात्र शिंदे गटात मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिंदे गटात मंत्रिपद अडीच-अडीच वर्ष विभागली जाणार आहेत. इच्छुक आणि नाराजांना थोपवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हा तोडगा काढल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही निश्चित माहिती आलेली नाही.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे, यासाठी लॉबिंग करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून 5 नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर 5 नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले. यामुळे महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपने शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्याऐवजी दुसरं खातं देऊ असे सांगण्यात आले. पण शिंदे गटाने त्यांची मागणी तशीच ठेवली.