गृहमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह

| Updated on: Dec 09, 2024 | 3:42 PM

शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपने शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्याऐवजी दुसरं खातं देऊ असे सांगण्यात आले. पण शिंदे गटाने त्यांची मागणी तशीच ठेवली.

गृहमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना, हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह
Follow us on

Maharashtra Cabinet expansion : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची वर्णी लागली. मात्र या शपथविधी सोहळ्यावेळी या तिघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याने शपथ घेतली नाही. तसेच अद्याप खातेवाटप कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत गृहमंत्रिपदावरुन धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले. यामुळे महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपने शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्याऐवजी दुसरं खातं देऊ असे सांगण्यात आले. पण शिंदे गटाने त्यांची मागणी तशीच ठेवली. त्यातच आता काल रात्री वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीतही एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांची दिली आहे.

मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता

तर दुसरीकडे गृहखाते न देण्यावर भाजप ठाम आहे. त्याऐवजी महसूल आणि इतर खाती घ्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. सध्या गृहमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा रात्री उशिरा बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान येत्या १२ डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी जर गृहखात्याचा तिढा सुटला नाही, तर मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेकडून ५ नवीन चेहऱ्यांना संधी

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झालेल असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यातच आता अनेक आमदार मंत्रीपद मिळावे, यासाठी लॉबिंग करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून ५ नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात रात्री एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळ खात्याच्या वाटपावरून चर्चा करण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर ५ नवीन आमदारांना मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे.